हिंगणी बु. येथे ग्रामस्थांकडून औताने व सिद्धीकी सरांचा बदली निमित्त सपत्नीक मानाचा सत्कार – अविस्मरणीय निरोप समारंभ
बीड. प्रतिनिधी विवेक कूचेकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणी बु येथील कर्तव्यदक्ष शिक्षक सर्फराज सिद्धीकी व जितेंद्र औताने यांचा बदली निमित्त गावकऱ्यांनी सपत्नीक निरोप समारंभ आयोजित करून भव्य सत्कार केला.गावकऱ्यांच्या प्रेमाने सजलेला हा सोहळा भावनिक वातावरणात पार पडला.

समारंभाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर गावकऱ्यांनी फेटा, शाल, पुष्पगुच्छ, ड्रेस व साडी देऊन दोन्ही शिक्षकांचा व त्यांच्या पत्नींचा मानाचा सत्कार केला.
शिक्षकांचे भावनिक मनोगत औताने सर म्हणाले “हा सन्मान माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी सुवर्णक्षण आहे. गेल्या काही वर्षांत शाळा, विद्यार्थी व गावासाठी जे काही करू शकलो ते केवळ गावकऱ्यांच्या निस्वार्थ सहकार्यामुळेच. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून शैक्षणिक व सामाजिक कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा मी प्रयत्न करीन.”
सिद्धीकी सरांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, “विद्यार्थ्यांचे प्रेम, पालकांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांचा विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. या ठिकाणच्या आठवणी माझ्या मनावर कायम कोरल्या गेल्या आहेत. या गावाने दिलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”
मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मा. अंकुशराव गोरे साहेब होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “ सिद्धीकी सर व औताने सरांनी गावातील मुलांमध्ये शिस्त,गुणवत्ता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.त्या दोघांनी शाळेसाठी खुप योगदान दिले, त्यांच्या योगदानामुळे शाळेचा दर्जा उंचावला असून गाव त्यांचा सदैव ऋणी राहील. आम्ही त्यांना पुन्हा आमच्या शाळेत यावे अशी विनंती करतो.”
अजित काका कुलकर्णी यांनी सांगितले,“शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे.सिद्धीकी सर आणि औताने सरांनी गावकऱ्यांशी जिव्हाळ्याने वागत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचा ठसा गावाच्या इतिहासात कायम राहील. अशी गुणी माणसं पुन्हा हिंगणी बु. शाळेत यावीत हीच आमची इच्छा आहे.”
डॉ. केशवदास वैष्णव यांनी भावनिक शब्दांत गौरव व्यक्त करताना सांगितले ,“औताने सरांनी शैक्षणिक उपक्रमातून व सिद्धीकी सरांनी सामाजिक जाणिवेतून विद्यार्थ्यांना घडवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुलांमध्ये ज्ञानाबरोबरच आत्मविश्वास व चारित्र्य घडले आहे. अशा शिक्षकांचा गावाला लाभ होणे हे भाग्य आहे. आम्हाला खात्री आहे की ते पुन्हा हिंगणी बु. शाळेत परत येतील.”
विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग समारंभात शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली हृदयस्पर्शी भाषणे,माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच सुर लावला – “सर, तुम्ही शाळा सोडून जाऊ नका. पुन्हा आमच्या शाळेत परत या.” त्यांच्या या भावनिक विनंतीने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
प्रमुख मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अंकुश नाईकवाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक कोकाटे सर,सहशिक्षक गायकवाड सर,राजकुमार कोकणे सर,शेख सर, रोहित वायसे सर उपस्थित होते.
ग्रामस्थांमध्ये देविदास जोगदंड, दिलीप वायसे,चंद्रकांत जोगदंड, स्वामी नाईकवाडे,शिवाजी जोगदंड, विजय वायसे,शमशाद सय्यद,अमोल वाससे, संभाजी वायसे,नवनाथ पवार, मच्छिंद्र सुरवसे,लक्ष्मण सपकाळ, रघुदास वैष्णव,भिकाराम वायसे,लगास,चव्हाण ताई,बोराडे ताई, राऊत मावशी यांची लक्षणीय उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचे प्रेम,गावकऱ्यांचा जिव्हाळा,मान्यवरांची पुन्हा शाळेत परत या अशी मनापासून केलेली विनंती,आणि सपत्नीक सत्काराचा मानाचा सोहळा – या सर्वामुळे औताने सर व सिद्धीकी सर यांच्या जीवनातील हा निरोप समारंभ खऱ्या अर्थाने अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.








