दादासाहेब दि.शं. पाटील महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा
विशेष प्रतिनिधी.. स्वप्निल पाटील एरंडोल
दिनांक 25 2025 रोजी दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर मुख्य वक्ता म्हणून मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय लोहार हे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर हे उपस्थित होते.
दादासाहेब अमित पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की भाषेचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेबरोबरच इतरही भाषांमध्ये प्राविण्य मिळवणे ही काळाची गरज आहे. जर आपल्याला दोन-तीन भाषांचे ज्ञान असेल तर रोजगाराच्या असंख्य संधी आपल्याला प्राप्त होतात हे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ता डॉ. विजय लोहार यांनी ‘हिंदी की अविरत प्रवाहित निर्मल धारा और हम’या विषयावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की भाषा ही विवादाचे नाही तर संवादाचे कार्य करते. संतांच्या काळापासून ते स्वातंत्र्य आंदोलन आणि आता पर्यंत हिंदी भाषा कशी सतत प्रवाहित आणि समृद्ध झाली या विषयी देखील त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. तर हिंदी विभागप्रमुख डॉ. स्वाती शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या भाग्यश्री चौधरी व हर्षदा यांनी स्वागत गीत गायले. तर प्रा. सपना पाटील यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. किशोर सपकाळे यांनी आभार व्यक्त केले.तसेच डॉ सविता पाटील व शेखर पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील तीनही शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









