एरंडोल नगरपरिषदेत पथ (रस्त्यावरील) खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
विशेष प्रतिनिधी..स्वप्निल पाटील जळगाव
प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या लोककल्याण मेळावा उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. लोककल्याण मेळावा दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नगरपरिषदेच्या पुढाकाराने राबविण्यात येत असून, नागरिक व पथ विक्रेत्यांसाठी विविध उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
प्रशिक्षण सत्रात भारतीय अन्न पदार्थ व मानांक प्राधिकरण (FSSAI) चे तज्ज्ञ श्री. रामेश्वर राजू यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना व्यवसाय करताना कोणत्या नियमांचे पालन करावे, शासनाकडून कोणती प्रमाणपत्रे मिळवावीत, तसेच अन्नपदार्थ विक्रीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी एरंडोल नगरपरिषद कार्यालय अधीक्षक श्री. शिवशंकर ठाकूर आणि कर निरीक्षक श्री. जनार्दन येवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. महेंद्र पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय संघटक श्रीमती कुसुम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय अधिक शिस्तबद्ध व स्वच्छतेच्या दृष्टीने उभारण्यास अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.








