तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करणा-या दोघांना अवघ्या चार तासात चिमुरडीसह कल्याण जि. ठाणे येथुन घेतले ताब्यात.
विमानतळ पोलिसांची दमदार कामगिरी.
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
पुणे :दि.२२सप्टेंबर २०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे येवुन माहिती दिली की, त्यांची लहान मुलगी वय ०३ वर्ष हिस सायंकाळी ०५:०० वाजल्या पासून गायब आहे व ती इसम नाव प्रिन्स पॉल वय २५ वर्ष व ओमनारायण पासवान याना त्यांना कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन पळवून नेले असण्याची शक्यता आहे. अशी तक्रार प्राप्त होताच विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांनी पोलीस स्टेशनचे तपास प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफ, सपोनि संतोष शिंदे, सपोनि शिरसाट यांना बोलावुन घेवुन दोन वेगवेगळी पथके तयार करुन तात्काळ मुलीचा शोध सुरु केला. तक्रारदार राहत असलेल्या लेबर कैम्पच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. आरोपींचे प्राप्त मोबाईल नंबरचे तात्काळ सीडीआर, लोकेशनची माहिती घेण्यात आली. नमूद आरोपींचे लोकेशन प्रथम तळेगाव दाभाडे येथे आले होते. म्हणून तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क करुन त्यांना महिती दिली व तपास सुरु केला. परंतु त्यानंतर आरोपीचे लोकशन लोणावळ्याचे आसपास आल्याने सदरचे इसम मुलीला घेवुन रेल्वेने प्रवास करीत असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांच्या सह एक तपास पथक मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.
आरोपी यांचे मो.बाईल नंबरच्या लोकेशनवरुन सदर आरोपी हे इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलीसांना सदर बाबत माहिती देवून आरोपी व लहान मुलीचे फोटो देण्यात आले होते. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या पोलीसांच्या मदतीने यातील आरोपी नाव १. प्रिन्स संजय पाल वय २१ वर्ष २. ओमनारायण छोटेलाल पासवान वय २० वर्ष दोघे रा. लेबरकॅम्प म्हाडा कॉलनी विमाननगर पुणे मुळ बिहार यांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे मुलीसह ताब्यातघेण्यात आलेले आहे. मुलगी वय ०३ वर्ष हिस सुखरुप तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४६४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत माने हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-४, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन श्री. गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे, लालु कन्हे, रुपेश पिसाळ, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, श्रीमंत यंपाळे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, शंकर वाघुले यांचे पथकाने केली.








