मुंबई गोवा महामार्ग : हेडलाईन पाळली नाही तर कोकणकर रस्त्यावर
कोकणच्या महामार्गासाठी जनआंदोलनाची हाक
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणकरांच्या आयुष्याचा कणा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचं काम रखडलं आहे. वारंवार डेडलाईन जाहीर होतात, पण प्रत्यक्षात काम थांबतं किंवा मंदावलेलं दिसतं. या उदासीनतेचा फटका थेट कोकणातील ग्रामस्थांना, प्रवाशांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसत आहे.
आज ही केवळ एखाद्या संघटनेची, एखाद्या गावाची किंवा राजकीय पक्षाची लढाई नाही. हा प्रत्येक कोकणकराचा प्रश्न आहे. म्हणूनच –
कोकणातील सर्व संघटना
गावातील मंडळं
राजकीय पक्ष
प्रत्येक जागरूक कोकणकर
यांनी या जनआंदोलनात स्वतःहून सामील व्हावं, ही वेळची गरज आहे.
जे गावकरी, ग्रामपंचायत, मंडळं किंवा स्थानिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत त्यांनी आजपासूनच आपली तयारी आणि सहभाग कळवावा.
या ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येकाचा गाव आहे, प्रत्येकाची गावात ओळख आणि एकत्र येण्याची ताकद आहे. आपण आपलं गाव, आपलं मंडळ यांना आवाहन करूया – फक्त एक दिवस द्या कोकणच्या हक्कासाठी.
अजूनही चार महिने आपल्याकडे आहेत. जर प्रत्येक कोकणकर एकत्र रस्त्यावर उतरला, तर हा महामार्ग पूर्ण करण्याशिवाय सरकारला दुसरा मार्ग राहणार नाही.
चला, आजपासूनच या जनआंदोलनाची तयारी करूया.
हा लढा केवळ रस्त्याचा नाही – हा आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी, आपल्या कोकणाच्या विकासासाठी आहे.
मुंबई–गोवा महामार्ग : डेडलाईन पाळली नाही तर कोकणकर रस्त्यावर
२०१९ पासून आपण मुंबई–गोवा महामार्गाबाबत सतत डेडलाईन ऐकत आलो आहोत.
“३१ डिसेंबर”, “३१ मे”, “गणेशोत्सवापूर्वी” अशा असंख्य तारखांची मालिका सुरुच आहे.
कधी तरी ही तारीख पाळली जाईल, अशी आशा प्रत्येक कोकणकरांनी मनाशी ठेवली.
पण हळूहळू या अपूर्ण आश्वासनांना आपण सवयीचेही झालो आहोत.
मात्र आता ही सवय मोडली पाहिजे.
सरकार व प्रशासनाने दिलेल्या सध्याच्या डेडलाईननुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण झालेच पाहिजे.
अन्यथा यावेळी कोकणकर शांत बसणार नाहीत.
काहींचे म्हणणे असेल की रास्ता रोकोसारख्या आंदोलनामुळे आपल्या लोकांनाच त्रास होतो.
पण प्रश्न असा आहे की, शासनाच्या दुर्लक्षामुळे आपण १२–१२ तास ट्रॅफिकमध्ये अडकतो.
तो त्रास सहन करत असताना कुणी आवाज उठवत नाही, मग खऱ्या हक्कासाठी एक दिवस आंदोलनाला उभे राहिलो तर त्यात चूक काय?
आपल्या भविष्यासाठी, कोकणच्या विकासासाठी, आपल्या पिढ्यांच्या सोयीसाठी,
आपण हा त्रास एकदाच सहन करू पण त्यातून शासनाला जागं करू.
म्हणूनच,
३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख मानून, काम पूर्ण झाले नाही तर रस्त्यावर उतरण्याची खूणगाठ प्रत्येक कोकणकरांनी मनाशी बांधली पाहिजे.
कोकणच्या महामार्गासाठी, जनआक्रोश समिती








