बालकलावंत सांगणार छत्रपती शिवरायांची गाथा
बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम :
राज्यभरातील बालकलावंतांचे सादरीकरण
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची गाथेचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेच्या २६ शाखास्तरावर प्राथमिक फेरी संपन्न झाली असून, या उपक्रमात संपूर्ण राज्यातून सात हजारांहून अधिक बालकलावंतांनी सहभाग घेतला होता. या प्राथमिक फेरीतील विजेत्यांची महाअंतिम फेरी दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल माटुंगा येथे संपन्न होणार आहे. या सादरीकरणाला सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
एकल गटात वय वर्षे ५ ते १० व वय वर्षे ११ ते १५ या वयोगटात तसेच समूह गट अशी विभागणी करण्यात आली आहे. एकल गट १ वय वर्षे ५ ते १० यांना छत्रपती शिवाजी महाराज तर एकल गट २ वय वर्षे ११ ते १५ व समूह गट यांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ते राज्याभिषेक हा विषय देण्यात आला आहे. प्रत्येक सहभागी व विजेत्या स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष अॅड.निलम शिर्के सामंत, उपाध्यक्ष प्रशासन अॅड.शैलेश गोजमगुंडे, उपाध्यक्ष उपक्रम डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, त्र्यंबक वडसकर, नागसेवन पेंढारकर, निमंत्रित सदस्य सीमा यलगुलवाल, शिवाजी शिंदे, वेदा सोनुले, सुजय भालेराव, वैभव जोशी यांनी केले आहे.
