अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पायाभूत परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुरमध्ये 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुलांची श्रृंखला
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
प्रतिनिधी सतीश कडू
नागपुरातील लहान वस्त्यांमधील सुविधांच्या कामांना पूर्ण करु
– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
▪️अमरावती मार्गावरील ज्ञानयोगी डॉ.श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे भव्य लोकार्पण
▪️स्व. डॉ.श्रीकांत जिचकार यांचे चिंतन दिशादर्शक
▪️मातोश्री सुलोचना जिचकार यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार
नागपूर,दि. 12 : ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार हे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. आपले ज्ञान त्यांनी स्वत:पुरते सीमीत न ठेवता प्रत्येक व्यक्तीला त्यांनी वाटले. व्यापक दूरदृष्टी असलेले ते भविष्यवेत्ता होते. काळाच्या पूढे जाऊन वाचणारे जे योगी असतात त्यांच्यापैकी ते एक होते. त्यांचे आर्थिक, सामाजिक, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील चिंतन हे महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे स्मरण केले. अमरावती मार्गावरील बहुप्रतिक्षीत असलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बोले पेट्रोल पंच चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौकापर्यंत असलेल्या चार पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुके, संदीप जोशी, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार विकास महात्मे, श्रीमती राजश्री श्रीकांत जिचकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कधी काळी विदर्भातील समग्र विकासाबद्दल कटिबध्दता असूनही अनेक उद्योजक पायाभूत सुविधा समाधानकारक नसल्याने येथे आपले उद्योगविश्व साकारण्यास उत्सूक नव्हते. याबाबत आम्ही प्राधान्याने विचार करुन सर्व शक्तीनिशी कटिबध्द होऊन यावर भर दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्राला आकार देत नागपूर महानगराचा कायापालट करुन दाखविला. आज नागपूर मध्ये देश विदेशातील जे शिष्टमंडळ भेटीला येतात. ते येथील पायाभूत सुविधा पाहून आवाक होत विविध करारासाठी, उद्योग विश्वासाठी विश्वासाने पुढे येत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
येथील शैक्षणिक सुविधा असोत, औद्योगिक विश्वाची पायाभरणी असोत, नवतंत्रज्ञान असो, येथील शेती, संत्रा प्रक्रिया उद्योग, खनिज उद्योग या सर्व क्षेत्राला घेऊन आम्ही समतोल विकासासाठी प्रयत्नरत आहोत. या प्रयत्नांना आता यश येत असून भारतातील सर्वात जास्त सोलर मॉड्युल निर्मिती उत्पादन क्षमता असलेले महानगर म्हणून नागपूर ओळखल्या जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. सोलर मॉड्युल निर्मितीचे एक हब स्वरुपात नागपुरमध्ये एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*नागपुरमध्ये 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुलांची श्रृंखला*
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अनेक महामार्ग व उड्डाणपुलांचे उद्घाटने मी केली. या ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे लोकार्पण करतांना मनात एक पोकळी व अनेक आठवणींची सोबत असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपले भावनिक बंध आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. राजकारणातील आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहावे अशा निवडक व्यक्तीमत्वांपैकी डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव आर्वजून घ्यावे लागेल. त्यांच्या कृतज्ञतेपोटी या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याच्या कल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार देत विद्यापीठाकडे जाणारा हा पूल आता खऱ्या अर्थाने ज्ञानयोगी मार्ग झाल्याचे ते म्हणाले.
नागपूर पासून विद्यापीठाचे अंतर या उड्डाणपुलामुळे आता कमी झाले आहे. या महानगरातील सर्व सेवासुविधांचा विचार करतांना येथील सांस्कृतिक, कला, क्रीडा, लहान मोठे व्यवसाय याला जपणारे महानगर म्हणून ओळख निर्माण व्हावी यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर महानगरात येत्या काळात 300 ठिकाणी खेळांची मैदाने साकारले जातील. यातून सूमारे एक लाख मुले दररोज मैदानावर खेळतील. त्यांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी विविध क्रीडा महोत्सव, स्पर्धा, कला महोत्सव यातून संधी देऊन राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू यातून घडतील असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपुरमधील लहान मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाच्या उत्तम अशा वातानुकूलित सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 9 ठिकाणी भव्य मार्केट संकुल आपण साकारणार आहोत. मेडिकल चौक येथे एक भव्य उड्डाणपूल साकारुन दिल्लीच्या पालिका बाजारच्या धर्तीवर मोठे मार्केट त्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. या महानगरात दळणवळणाच्या, सार्वजनिक वाहतुकीच्या सेवासुविधा अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी मेट्रो, ईलेक्ट्रीक बस सुविधांसमवेत 135 आसनक्षमता असलेले वातानुकूलित फ्लॉशबस लवकरच नागपुरातून धावेल असे त्यांनी सांगितले. ऑरेंज सिटी, झिरो माईल सिटी व इतर वैभवांसमवेत हे महानगर स्पोर्टसिटी म्हणून नावारुपास आणले जाईल, असे त्यांनी सांगितले.
*नागपुरातील लहान वस्त्यांमधील सुविधांच्या कामांना पूर्ण करु*
– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
रोज नवनवीन जेथे आकाराला येते ते म्हणजे नागपूर अशी नवी ओळख आपली निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयत्नातून हे महानगर या देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून लवकरच ओळखल्या जाईल,असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरातील मोठ्या प्रमाणात ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत त्याच कटिबध्दतेने येथील लहान-लहान वस्त्यांमध्ये जी महत्वाची कामे आहेत ती सर्व प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 317 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.
नझूल जमिनीवर ज्यांची घरे आहेत ती नियमानुसार कायदेशिर करुन एक लाखापेक्षा अधिक लोकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. झुडपी जंगल क्षेत्रात जे गोरगरिब अनेक वर्षांपासून राहत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आपण न्याय देत आहोत. या महानगरात भूयारी गटार योजनेचा नवा डिपीआर आपण तयार करीत आहोत. तो लवकरच मार्गी लागेल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कोराडी रोड कडून भोसला मिलट्री टीपाईंटवर उड्डाणपुलाची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली. ही मागणी त्यांनी मान्य करुन तशी घोषणा केली.
स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना जिचकार या प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्यासपीठावर येऊ शकल्या नाहीत. त्या व्यासपीठासमोर व्हीलचेअरवर बसल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मान्यवरांनी स्टेजवरुन खाली उतरत त्यांचा जागेवर सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली.
