अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या अनुयायांच्या
आवश्यक सुविधांचे नियोजन करुन खातरजमा करा
जिल्हास्तरीय प्रशासकीय आढावा बैठकीत निर्देश
नागपूर, दि.11: प्रशासनासाठी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे आयोजन महत्वपूर्ण असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता, खानपान सुविधांचा योग्य वापर करता यावा, यादृष्टीने तातडीने नियोजन करुन याची खातरजमा प्रत्येक विभागाने करावी, अशा सूचना आज प्रशासकीय आढावा बैठकीत देण्यात आल्या.
पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शहर पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजनाच्या तयारीचा विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.
पुढील महिन्यात दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन होत आहे. त्यासाठीच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा बैठकीला माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे डॉ.सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई याच्यासह प्रशासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्नानगृहे, शौचालये, सुरक्षा आदी व्यवस्थेसह अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी.
दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अभिवादनासाठी येणाऱ्या राज्याच्या विविध भागांसह देश-विदेशातील अनुयायांना सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या नियोजनाबाबत यावेळी विभागनिहाय माहिती देण्यात आली. दीक्षाभूमी व परिसरात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतेची विशेष काळजी घेत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची व्यवस्था तसेच, रेल्वे स्थानक व बसस्थानकांवरही स्वच्छतेची काळजी घेण्यात येणार आहे.
