अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कोराडी येथे ग्रामीण भागातील महिलांना मिळणार कलमकारी गारमेंट क्लस्टरचे बळ
– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
प्रतिनिधी सतीश कडू
▪️निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे व वस्त्र प्रक्रियेसाठी 5 कोटीचा नाविण्यपूर्ण विकास निधी
नागपूर,दि. 8 : कोराडी येथील आदिशक्ती म्हणून श्रध्दा असलेल्या महालक्ष्मी देवी संस्थानच्या परिसरात ग्रामीण भागातील महिलांना अधिकाधिक रोजगार-स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीतून लवकरच कोराडी येथे कलमकारी गारमेंट क्लस्टर साकारले जात आहे. याबाबत नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत या वैशिष्टपूर्ण प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयाचा निधी नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.
ग्रामीण भागातील महिलांच्या भक्तीला स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याची जोड मिळावी यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजना व इतर योजनांवर भर दिला आहे. माविम अंतर्गत स्थानिक महिलांना या योजनांद्वारे विविध कौशल्याचे प्रशिक्षण, क्षमता बांधणी, आत्मविश्वास निर्मिती व स्वदेशी उत्पादनाला चालना हे ध्येय निश्चित करुन अनोखा उपक्रम सुरु होत आहे.
खादी, सुती व कॉटन अशा वैविध्यपूर्ण स्वदेशी तागावर कलमकारी ठशाच्या माध्यमातून उत्पादीत ड्रेस मटेरियलला संबंध भारतासह विदेशातही मोठी मागणी आहे. हस्तकला कौशल्यातून साकारणाऱ्या या निर्मिती प्रकल्पाचे क्लस्टर्स कोराडीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहचावेत यासाठी हा उपक्रम अत्यंत वैशिष्टपूर्ण पूर्ण ठरेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. विकासाच्या इतर योजनांसह भविष्यातील उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील संधी लक्षात घेता महिलांना अधिकाधिक नाविण्यपूर्ण कौशल्यापर्यंत पोहचविण्यासाठी माविमने पुढे यावे, यासाठी आवश्यकत्या प्रशिक्षणाचे, क्षमता बांधणीचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
*असे असेल प्रदुषण रहित गारमेंट क्लस्टर*
याचा पहिला टप्पा म्हणून महिलांच्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या समितीने एन.डी. जेम्स या संस्थेची निवड केली आहे. कोराडी मंदिर परिसरात प्रशस्त हॉलमध्ये हे प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. हॅन्ड ब्लॉक प्रिंटींग अर्थात विविध पारंपारिक कलात्मक असलेल्या डिझाईन्स ब्लॉकवर उतरवून त्याद्वारे हाताने नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून ड्रेस मटेरियल तयार केले जाईल. या कपड्यापासून विविध आकारातील ड्रेसची निर्मिती केली जाईल. यासाठी लागणारे कटिंग टेबल्स, प्रगत शिलाई मशिन्स, खादी, कॉटन, फॅब्रीक, वाशिंग युनीट, ब्लॉक मेकींग आदी सुविधा असतील. यात 10 टन वजनाचे पिगमेंट प्रिंटीग मशिन हे मुख्य आकर्षण राहील. सूमारे 200 महिलांचे प्रशिक्षण जगदंबा देवी संस्थान मार्केट येथे होईल.
याच ठिकाणी महिलांना निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे, वस्त्र प्रक्रिया, लोकर व सुतापासून गालिचा, सेंद्रिय वस्तुंची निर्मिती, गो-पालन,गोमूत्रापासून जीवामृत निर्मिती, महिलांसाठी स्वतंत्र मॉल व विक्री केंद्र प्रस्तावित आहेत.
00000
