अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सौहार्द, शिस्त व भक्तीभावाने गणेशोत्सव शांततेत…
पोलीस अधिकाऱ्यांचा स्नेहबंधतर्फे सन्मान.
प्रतिनिधी- सारंग महाजन
अहिल्यानगर | उत्साह, भक्तीभाव आणि ढोल-ताशांच्या गजरात अहिल्यानगरातील गणेशोत्सव शांततेत पार पडला. हजारो भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. सौहार्द, शिस्त व भक्तीभावाने गणेशोत्सव शांततेत पार पडल्याबद्दल स्नेहबंध फाउंडेशन तर्फे पोलीस प्रशासनाचा गौरव करण्यात आला.
मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक पार पडली असली तरीही कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत व शिस्तबद्धरीत्या संपन्न झाला. यामागे पोलीस प्रशासनाचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षा बंदोबस्ताची महत्त्वाची भूमिका होती. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या देखरेखीखाली संपूर्ण गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.
या उत्तम नियोजन व कार्याबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचा रोप देऊन सन्मान केला.
डॉ. शिंदे म्हणाले, ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीभावाने व उत्साहाने पार पडलेले विसर्जन हे पोलिसांच्या दक्षतेमुळे शक्य झाले. वाहतूक व्यवस्थापन, शिस्तबद्धता आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. पोलिसांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.”
‘स्नेहबंध’ समाजात सौहार्द टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून विविध सामाजिक उपक्रमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील स्नेहबंध दृढ करण्याचे कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
