पुणे वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यास प्रारंभ, नाना पेठेत आरोपीच्या मुलाचा मर्डर
संपादक मंगेश पवार
पुणे- माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात सहभागी झालेल्या गुन्हेगारांना टार्गेट करत वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र शहरात निर्माण झाले असून त्याचा दुसरा भाग आज उघड झाल्याचे वृत्त आहे .पहिला भाग पोलिसांनी उधळवून लावला होता मात्र आज नाना पेठेत वनराज च्या खुनात सहभागी असलेल्या एका आरोपीच्या मुलाचा खून करण्यात आल्याचे वृत्त येथे वेगाने पसरले आहे. गणेश विसर्जन मिरवणूक उद्या असताना त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पुढे आंदेकर खुनाच्या बदला प्रकरणाने मोठे आव्हान उभे केले आहे.
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे . हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या असून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.गोळ्या झाडून खून झालेला तरुण म्हणजे गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश कोमकर हा एक वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी होता.
वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीला (Andekar Gang) पिस्तुले पुरविल्याच्या संशयावरुन गुंड टिपू पठाण टोळीतील (Tipu Pathan Gang) दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सोमवार पेठेतून दोनच दिवसापूर्वी अटक केली होती, बहुधा हा प्लान A फिस्कटल्यावर प्लान B अंमलात आणला गेला असावा असा अंदाज व्यक्त होतो आहे.
बरोबर १ वर्षापूर्वी १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर ची हत्या झाली होती . या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी २३ हल्लेखोरांना अटक केली होती . त्यांना मोका लावण्यात आला आहे. अद्यापही हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत . नुकतेच या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असताना दत्ता काळे नामक एकाला पोलिसांनी अटक केली होती .या कटासाठी पिस्तुल पुरविण्यासाठी टिपू पठाण टोळीने मदत केल्याची पोलिसांची माहिती आहे . यामुळे या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक देखील केली नुकतीच केलेली आहे गणेशोत्सवानिमित्त गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक गुन्हेगार चेक करत असताना पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे व पोलीस हवालदार अनिकेत बाबर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सोमवार पेठेतील समर्थ व्यायाम शाळा येथे कुख्यात गुंड टिपू पठाण गँगमधील रेकॉर्डवरील गुंड तालिम खान व युनुस खान हे उभे असून त्यांच्याकडे पिस्टल आहे. या माहितीनुसार पोलीस पथकाने त्यांना चारही बाजूने घेरुन अचानक पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस आढळून आले होते.
वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि साथीदारांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. त्यांच्या घराची पाहणी करुन गायकवाड याच्या निकटवर्तीयांचा खून करण्याचा कट आंदेकर टोळीने रचला होता. आंदेकर टोळीतील अमन पठाण याच्यासोबत तालीम खान याचे मोबाइलवरुन संभाषण झाले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. .
