अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पालक बनले शिक्षक
आळंदी :-प्रतिनिधी सोमनाथ काळे
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिन उत्साहात संपन्न झाला.
प्रशालेने पालकांमधून शिक्षक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचा लाभ घेत २८ पालक शिक्षक व त्यामधील एक मुख्याध्यापक यांना संधी देण्यात आली. प्रशालेने इयत्तावार केलेल्या दिवसभराच्या नियोजनाप्रमाणे पालक शिक्षकांनी वेळेत उपस्थित राहून बालवाडी ते इयत्ता चौथीच्या १२ वर्गांचे अध्यापनाचे आनंदाने कामकाज केले. संपूर्ण दिवसाचा प्रशालेचा कार्यभार यशस्वीरित्या पार पाडत शिक्षक बनण्याचा आनंद घेतला.
शेवटच्या तासिकेमध्ये समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, प्रशालेचे *मुख्याध्यापक प्रदीप काळे, २८ शिक्षक बनलेले पालक, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.
प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकामध्ये प्रशालेमध्ये राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची माहिती देत शिक्षकाची भूमिका, पालकाची भूमिका, शिक्षणाचा हेतू प्रत्यक्षरित्या समजावा म्हणून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
याप्रसंगी पालक शिक्षक भाग्यश्री भागवत, अमृता कारेकर, भाग्यश्री बैरागी, अंजली ढगे, शितल ढवळे, चंदा खुळे, पुजा साकोरे इ. पालकांनी शिक्षक बनण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशालेचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. प्रशाला करत असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या व भविष्यात प्रशालेच्या उपक्रमांमध्ये आणि कार्यामध्ये सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुर्यकांत मुंगसे यांनी प्रशालेमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
एक दिवसीय मुख्याध्यापक रामेश्वर गाडे यांनी प्रशाला चालवण्यासाठी सूक्ष्म नियोजन, यशस्वीरित्या अंमलबजावणी आणि योग्य नेतृत्व गुणांची आवश्यकता असते असे मत व्यक्त करत प्रशालेस विद्यार्थी उपयोगी वस्तू देण्याचे आश्वासन दिले.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यकारी सदस्य अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशालेत राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत संस्थेचा इतिहास व गौरवशाली परंपरा पालकांना सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, नियोजन व आभार राहुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली शेळके, प्रतिभा भालेराव, गजानन राठोड, गीतांजली मोरस्कर यांनी सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
