अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादक संतोष लांडे
गावातील प्रत्येक रस्त्याला आता सांकेतिक क्रमांक
राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय
राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीच्या लढ्याला मोठे यश
राज्यातील सर्व गावातील सर्व रस्त्यांना आता विशिष्ट सांकेतिक क्रमांक कोड मिळणार आहे. या सर्व रस्त्यांचे सीमांकनही केले जाणारा असून, त्याची महसुली गाव दप्तरात एकत्रित नोंद केली जाणार आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्यांना सांकेतिक क्रमांक देण्यात आला असून, अहिल्यानगर जिल्ह्याचा सांकेतिक क्रमांक 5 नमूद करण्यात आला आहे. तालुका आणि गावांनाही असे क्रमांक देण्यात येणार आहेत. तसा अध्यादेश राज्य सरकारने 29 ऑगस्ट रोजी जारी केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे शेतापानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी स्वागत केले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या या आदेशाने गावातील रस्त्यावरील भविष्यातील वाद कमी होणार आहेत. यासह ग्रामस्थांना हक्काचे रस्ते उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, अंतर मशागत, कापणी, मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही शेत रस्त्याची आवश्यकता आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वाढत आहे. यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते गरजेचे आहेत. राज्यात 1890 ते 1930 या कालावधीत मूळ जमाबंदी वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशात तसेच एकत्रीकरण योजने वेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशात त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते शिवरस्ते गाडी मार्ग पाय मार्ग दर्शविण्यात आलेले आहेत. त्यामुळे मात्र वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तर यांना नाहीत, यामध्ये शेतावर जाणारे पाय मार्ग व गाडी मार्ग यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी अतिक्रमण अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांचे वर्गीकरण करणे, या रस्त्यांच्या अधिकार अभिलेखातील नोंदी घेणे, तसेच या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष सहकार्य महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तत्परतेने चळवळीच्या मागण्या मान्य करत निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल राज्य शेतपानंद रस्ते चळवळीने मंत्रिमहोदयांचे कौतुक केले आहे. व लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी यासाठी विनंती करण्यात आली*
* राज्यातील सर्व जिल्ह्याना सांकेतिक क्रमांक.
विभागीय आयुक्त तालुक्यांना कोड देणार
जिल्हाधिकारी गावांना कोड देणार
एकत्रित नोंद होणार
— गावातील सर्वच रस्त्यांची गाव नमुन्यावर एकत्रित नोंद होणार आहे याकरिता प्रत्येक ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, महसूल सेवक, कोतवाल व पोलीस पाटील हे सर्व शिवार फेरी आयोजित करून रस्त्यांची यादी तयार करतील. यानंतर या रस्त्यांवरील अतिक्रमण ही काढली जातील. या सर्व रस्त्यांची गाव नमुन्यात नोंद करण्यासाठी स्वतंत्रपणे गाव नमुना नंबर 1 (फ ) निर्माण करण्यात आला आहे. त्यात ही नोंद होणार आहे.
