गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे अपघाती मृत्यू; दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अकोट प्रतिनिधी निळकंठ वसू पाटील
दिनांक 30 ऑगस्ट 2025
दि. 29 ऑगस्ट रोजी रात्री अकोला-अकोट मार्गावरील महाराष्ट्र महावितरण चौहट्टा बाजार कार्यालयासमोर झालेल्या दुर्दैवी अपघातात अक्षय गजानन इंगळे या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गिट्टीच्या ढिगाऱ्याला धडकून झाला असून, सदर गिट्टी रस्त्यावर विनाकारण टाकण्यात आल्यामुळेच हा जीव गेला, असा आरोप करण्यात येत आहे.
या अपघातास जबाबदार सिव्हिल डिपार्टमेंट, संबंधित अधिकारी, कंत्राटदार व अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभाग अध्यक्ष श्री. पूर्णाजी खोडके यांनी केली आहे.
श्री. खोडके यांनी चौहट्टा बाजार येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित विभागांची आहे. गिट्टी रस्त्यावर टाकून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
