अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला- सुभाष ढगे
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
६४ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
सेलू : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दोनशे मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पानवठे , धर्मशाळा बांधल्या. राजकीय सामाजिक कर्तृत्व सिद्ध करतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांस्कृतिक इतिहास जिवंत केला. असे प्रतिपादन बाल विद्या मंदिर हायस्कूल, परभणी येथील सहशिक्षक, प्रसिद्ध वक्ते सुभाष ढगे यांनी केले. ६४ वी गणेशोत्सव व्याख्यानमाला नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून गणेशोत्सव व्याख्यानमालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे दुसरे पुष्प शुक्रवार ( दि.२९ ) रोजी संपन्न झाले. प्रमुख वक्ते म्हणून सुभाष ढगे हे होते. तर अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेच्या सहशिक्षक संगिता खराबे या होत्या. पुढे बोलताना सुभाष ढगे म्हणाले की,” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्याग, समर्पण, पारदर्शक राज्यकारभाराच्या मूर्तीमंत प्रतीक आहेत. त्यांनीच प्रथम स्त्रियांना सैन्यात भरती केले. अहिल्यादेवी होळकर यांचे ग्रंथालय होते. युद्धतंत्र,अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, राजतंत्रांचा त्यांना अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी समाज उपयोगी कार्य केले आहे. ” असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद ठाकर यांनी दिला. तर प्रा. नागेश कान्हेकर यांनी आभार मानले. व्याख्यानास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, अजिज खा पठाण यांच्यासह गुरूबसअप्पा पंचगल्ले, संतोष खाडप, शोभा ढवळे, ललिता गिल्डा, रमा बाहेती, गंगाधर गुंजकर, सतीश बाहेती, रवी मुळावेकर, रवि कुलकर्णी , बाळू बुधवंत यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य श्रोत्यांची उपस्थिती होती. व्याख्यानमाला यशस्वीते साठी मुख्याध्यापक संतोष पाटील, अजित मंडलिक, डॉ. काशिनाथ पल्लेवाड आणि गणेशोत्सव व्याख्यानमालेचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
