हिंगोली च्या कयाधू नदीच्या पुरात युवक वाहून गेला – शोधकार्य सुरू
हिंगोली . श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली शहरातील कयाधू नदीत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला एक 19 वर्षीय युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अधिक मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेख अरबाज शेख फिरोज (वय अंदाजे 19 वर्षे, रा. महादेव वाडी, हिंगोली) हा आपल्या मित्रासोबत कयाधू नदीवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक खोल पाण्यात गेला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सय्यद आयुब, तलाठी वाबळे, तहसील कार्यालयाची आपत्कालीन बचाव टीम, तसेच हिंगोली नगरपालिकेचे कर्मचारी अक्षय तांडेले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हिंगोली ग्रामीण पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, NDRF किंवा अन्य जल बचाव पथकाचीही मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना कयाधू नदीकाठी अथवा खोल पाण्यात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत नदीच्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असतो, त्यामुळे अशा ठिकाणी जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिला आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली असून, पोलीस व प्रशासनाकडून नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
