अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास गट्टा ते सरांडा (बुज) रस्त्यावर नाल्यांचा अडथळा
प्रतिनिधी : प्रशांत पेदापल्लीवार
पेंढरी : धानोरा तालुक्यातील गट्टा गावापासून अवघ्या ५ कि.मी अंतरावर असलेले सरांडा (बुज) हे गाव अद्यापही मुख्य रस्त्याला जोडलेले नाही. गट्टा ते सरांडा (बुज) या मार्गावर तब्बल पाच छोटे नाले असून, त्यापैकी केवळ दोन नाल्यांवरच छोट्या पुल्या बांधण्यात आल्या आहेत. उर्वरित तीन नाल्यांवर ग्रामस्थांना कष्टाने बांबूंचे काढडे लावून ये-जा करावी लागत आहे भारताला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष झाले तरी सरांडा गावाला जाण्यासाठी अजूनपर्यंत पक्का रस्ता नाही .
पावसाळ्यात या रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट होते. नाले ओसंडून वाहतात आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या देखील निर्माण होतात. तरीदेखील आजवर प्रशासन ना आमदार, ना खासदार, ना जिल्हा परिषद सदस्य अशा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी गावाला भेट दिलेली नाही. फक्त निवडणुकीच्या काळातच या गावाची आठवण होते, आदिवासी भागातील विकास कधी होणार अशी ग्रामस्थांची खंत आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत अद्याप नाली बांधकाम झालेले नाही. विकासकामापासून वंचित असलेल्या गावकऱ्यांनी स्वतः श्रमदानातून मार्ग काढला. ग्रामसभा अध्यक्ष हरिदास हिचामी, सचिव राजेश हिचामी, यशवंत पद्दा तसेच हरंडा गावातील कुटुंबीय सदस्य उपस्थित होते. त्यांनी नाल्यावर बांबूचे काढडे लावत गावकऱ्यांसाठी तात्पुरता मार्ग तयार केला.
गावकऱ्यांचा प्रश्न एकच सरकारी योजना, विकासकामे आणि लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे लक्ष आमच्या गावाकडे कधी वळणार?”
