40 वर्षापासून मंगनाळीचे पुनर्वसन कागदावरच
आता तरी शासन प्रशासन जागे होईल का?
धर्माबाद (गजानन वाघमारे) तालुक्यातील मंगनाळी गावच्या पुनर्वसनाची प्रक्रिया मागील 40 वर्षापासून प्रलंबित असून लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार याकडे आता तरी लक्ष देतील का असा टाहो मंगनाळी येथील नागरिक करीत आहेत.
दिनांक 27 व 28 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार व ढगफुटी सदृश्य परिस्थितीत मंगनाळी गाव पूर्णतः पावसाच्या पाण्याच्या विळख्यात अडकले आहे. यामुळे गावातील अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे कुटुंबाचे संसार उघड्यावर आले असून त्यांना पूरपरिस्थितीपासून वाचवायचे असेल तर कायम उपायोजना करण्याची गरज आहे.
दिवंगत आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या कार्यकाळात पुनर्वसन प्रक्रियेला सुरुवात झाली होती काही तांत्रिक अडचणी असल्याकारणाने पुनर्वसनाची प्रक्रिया मंदावली होती. दिवंगत आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे अंशतः पुनर्वसन मंजूर होऊनही 40 वर्षात केवळ जागा अधिग्रहण करण्यात आली परंतु पुढील कार्यवाही करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे मंगनाळी येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात त्यांना धर्माबाद येथे स्थलांतरित करण्यात येते त्यानंतर कोणीही त्याकडे लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे. मंगनाळी गावातून विद्यमान आमदार राजेश पवार यांना दोन्ही वेळेस भरघोस मताधिक्य मिळाले. निवडून आल्यानंतर मंगनाळीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावेन असा शब्द देऊनही आमदार राजेश पवार यांनी आजपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी मंगनाळीकरांना पावसाळ्यामध्ये नरकयातना भोगाव्या लागतात.
उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी आपल्या फौज फाट्यासह पूर परिस्थिती ची पाहणी केली लोकांच्या समस्या जाणून घेतल्या अनेक कुटुंबाच्या घरात शिरलेले पुराचे पाणी पाहिलं व तात्काळ पंचनामे करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले परंतु पूर परिस्थिती निवळल्यानंतर पुनर्वसनाच्या प्रक्रियेकडे लक्ष देतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
