अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सिंहगड रोड ब्रिजच्या उद्घाटनासाठी मनसेचा पुढाकार; अनेक मनसैनिक ताब्यात
गनिमी काव्याने हा पूल नागरिकांसाठी खुला करणारच मनसेचा निर्धार
पुणे – सिंहगड रोडवरील नवीन पूल नागरिकांसाठी तात्काळ खुला करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलन छेडले. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, युवानेते मयुरेश वांजळे, शिवाजी मते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मागील आठवड्यातच मनसेकडून पुणे महानगरपालिकेला पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज मनसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पूल उद्घाटनासाठी पूजा करून बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबवले.
परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही मनसैनिकांनी नागरिकांच्या सेवेसाठी पूल उघडण्याचा प्रयत्न केला. “केवळ मान्यवरांच्या सोयीसाठी पूल बंद ठेवणे हा नागरिकांवरील अन्याय आहे. वाहतूककोंडीमुळे सर्वसामान्यांचा छळ होत आहे. हा अन्याय मनसे कदापिही सहन करणार नाही,” असे साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केले.
युवानेते मयुरेश वांजळे यांनी प्रशासनावर कठोर शब्दात टीका केली. “सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांवर होणारा हा अन्याय मनसे थांबवणार,” असे ते म्हणाले.
शिवाजीराव मते यांनी “हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र भविष्यात गनिमी कावा करून हा पूल नागरिकांच्या सेवेत देऊ,” असा इशारा दिला.
खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका करत “मनसेला श्रेय मिळू नये म्हणून पोलिसांमार्फत दडपशाही सुरू आहे,” असा आरोप केला. मनसे नेत्या सोनाली पोकळे यांनीही शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र सैनिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मनसे नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच सोडण्यात आले. या सर्व आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मयुरेश वांजळे, विजय मते,
शिवाजीराव मते, ॲड. सुनील घोरपडे, रमेश करंजावणे, अतुल शेळीमकर, शांता कोकरे, बाळासाहेब मंडलिक, सिद्धार्थ पोकळे, प्रशांत पवार, निलेश जोरी, आकाश साळुंखे, हर्षल रायकर, नयन धोत्रे राहुल वाळुंजकर, स्वप्निल नांगरे, सूर्यकांत कोरे, बाळासाहेब हनमघर, गणेश धुमाळ, परवेज शेख, अभिजीत भिसे, शुभम जगदाळे, सचिन लाटे, राजाभाऊ निवगुणे, नितीन भांडवलकर, सागर पाटील आदींसह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.
नागरिकांसाठी मनसेने उचललेले हे पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
