अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एक पेड मां के नाम
पब्लिक रिलेशन सोसायटीतर्फे वृक्षारोपण
नागपूर दि. 25 : पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतर्फे केंद्र शासनाच्या *एक पेड मां के नाम* या आवाहानानुसार प्रशांत नगर येथील उद्यानात संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष(पश्चिम क्षेत्र) एस.पी. सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
अजनी चौकातील प्रशांत नगर परिसरातील उद्यानात बकुळ, पारिजात, चाफा तसेच विविध प्रकारचे उपयुक्त वृक्ष लावून पीआरएसआय या संस्थेचे पदाधिकारी तसेच या भागातील नागरिकांनी वृक्षारोपण मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला. पीआरएसआय संस्थेचे नागपूर अध्यक्ष यशवंत मोहिते व सचिव मनिष सोनी यांनी वृक्षारोपणासंदर्भात तसेच “एक वृक्ष आईच्या नावे” या प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
वृक्षारोपण करतांना निसर्गातील समतोल राखणाऱ्या वृक्षांचे प्रामुख्याने वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता असून पीआरएसआय संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीनंतर त्याचे नियमित संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. संस्थेच्या नागपूर शाखेचे उपाध्यक्ष अखिलेश हळवे, कोषाध्यक्ष शरद मराठे, वरिष्ठ सदस्य अनिल गडेकर, मधुसुदन देशमुख, नितीन करारे, श्रीमती रेणुका बोकारे, असरानी, तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आशिष जैन आदींनी विविध प्रजातीचे वृक्षारोपण केले. एक वृक्ष आईच्या नावे लावण्यात येत असून या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारण्याचा संकल्प सर्व सदस्यांनी यावेळी केला.
वृक्षारोपणासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे आवश्यक संपूर्ण सहकार्य करण्यात आले असून वृक्षारोपण मोहिमेचे समन्वयक मनिष सोनी यांनी संस्थेची तसेच या मोहिमेची माहिती यावेळी दिली. प्रारंभी पीआरएसआय संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी.सिंह, नागपूर चापटरचे अध्यक्ष यशवंत मोहिते यांचे स्वागत करण्यात आले.
