अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
फाउंड्री उद्योगाला अग्रगण्य स्थान मिळण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
नागपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्री मेनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला केले संबोधित
नागपूर २४ ऑगस्ट २०२५
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये तसेच फाऊंड्री ( धातू ओतण्याच्या उद्योगांमध्ये )अपार शक्यता असून आपण जर निर्यात वाढवली आणि आयात कमी केली तर फाउंड्री उद्योगांमध्ये आपण जगात क्रमांक एकवर राहू . यासाठी फाउंड्री उद्योगाने परंपरागत पेट्रोल , कोळसा अशा इंधनाच्या वापरा ऐवजी पर्यावरण पूरक हायड्रोजन या भविष्यातील इंधनाचा वापर करावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले .इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेन (आयआयएफ ) या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना ते आज बोलत होते .
याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेनचे अध्यक्ष नवनीत अग्रवाल उपस्थित होते .
धातू ओतण्याच्या उद्योगाच्या अर्थात फाउंड्रीच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला होणाऱ्या फायद्याबद्दल त्यांनी उपस्थितांना अवगत केले . त्यांनी यावेळी ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्राची माहिती देताना सांगितले की , 2014 ला ज्या उद्योगाची उलाढाल 12 लाख कोटींची होती ती आता 22 लाख कोटींवर आली असून 6 महिन्यापूर्वीच आपण ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत .प्रथम क्रमांकावर अमेरिका तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून पुढील काळात या वाहनउद्योग क्षेत्रात आपल्याला प्रथम क्रमांक गाठायचा आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले .ऑटोमोबाईल उद्योगात जसे पर्यावरण पूरक ग्रीन हायड्रोजन ,जैवइंधन सीएनजी यांचा वापर होतो .त्याच धर्तीवर फाउंड्री उद्योगाने जर ग्रीन हायड्रोजनचा वापर केला तर त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये कमी येईल तसेच या उद्योगाची आयात आणि निर्यात क्षमता वाढेल .
१९५० मध्ये स्थापन झालेली इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन ( आयआयएफ) ही मेटल-कास्टिंग उद्योगाची अखिल भारतीय संघटना आहे आणि फाउंड्री उद्योगाच्या ग्राहकांसाठी आणि पुरवठादारांसाठी एक अग्रगण्य संस्था म्हणून काम करत आहे .
कोलकाता येथे मुख्यालय असलेले आयआयएफचे कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे ४ प्रादेशिक कार्यालये असून चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे ४ उत्कृष्टता केंद्रे कार्यरत आहेत
