अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अधिकाधिक लोकहितासह देशाच्या सुरक्षिततेसाठी कालसुसंगत परिपूर्ण संशोधनाची गरज
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
प्रतिनिधी सतीश कडू
▪️व्हीएनआयटी येथील राष्ट्रीय सुरक्षेसाठी
▪️*तरुणांची भूमिका आणि विकास या परिषदेचा समारोप*
▪️*ले. जनरल व्ही. के. चतुर्वेदी, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा परिसंवादात सहभाग*
नागपूर, दि. 23 – कोणत्याही शिक्षणाचे, संशोधनाचे अंतिम ध्येय हे लोक कल्याणासमवेत विकासाला गती आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक महत्वपूर्ण असते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या व कृत्रिम गुणवत्तेच्या या काळात देशाला जर अधिक सुरक्षित आणि भक्कम करायचे असेल तर युवकांनी आपल्या संशोधनाची व्याप्ती जागतिक ज्ञानाच्या कक्षेसमवेत उंचावत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर सर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ टेक्नॅालॅाजी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ही परिषद युथ फॉर नेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. यावेळी ले. जनरल व्ही. के. चतुर्वेदी, एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, प्रोफेसर योगेश देशपांडे उपस्थित होते.
भारतातील शैक्षणिक सुविधा भक्कम होत असताना या शैक्षणिक संस्थांमधून, विद्यापीठांमधून जे संशोधन होत आहे, जे पेटंट आपण मोठ्या संख्येने मिळवित आहोत त्या पेटंटमध्ये आजच्या काळाशी साधर्मय साधणारी, आजच्या काळाला आवश्यक असणारे हे पेटंटस आहेत का हा कळीचा प्रश्न आहे. विकास प्रक्रियेला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी लोकहित, देशाची सुरक्षितता, सुरक्षित माहिती तंत्रज्ञान या बाबींवर युवकांनी अधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
सायबर सेक्युरिटी अर्थात आपल्या वैयक्तिक आर्थिक माहितीसह देशाच्या सुरक्षिततेबाबत असणारी माहिती ही अधिक सुरक्षित असली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुणाचीही होणारी फसवणूक ही आपण इतरांना दिलेल्या माहितीतूनच होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पैशाचा जिथे संबंध असतो तिथे फसवणूक व गुन्ह्याची शक्यता अधिक असते. दूरध्वनीवर, सोशल मीडियाच्या प्लॅटफॅार्मवर, आपल्याशी साधला जाणारा संवाद हा मानशास्त्रीय हॅकचा प्रकार तर नाही ना, याची दहादा प्रत्येकाने खातरजमा करून घेतली पाहिजे. जर अशा संभाषणात आपण बळी पडलो, आपले पैसे कुणी खात्यातून वळविले तर त्वरित १९३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
शासनात डिजिटल अरेस्ट हा प्रकार अजिबात नाही. शंका येणारे संदेश गुगलवर टाकून पाहिल्यास त्याबाबत लागलीच स्पष्टता आपल्याला मिळते. सायबर दोस्त हे एक्सवरील शासनाचे स्वतंत्र हँडल यासाठीच तयार करण्यात आले आहे. याचबरोबर www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही फसवणूक झालेल्या व्यक्तीला आपली तत्काळ तक्रार दाखल करता येईल, असे त्यांनी सांगितले.
गुगलसारख्या संकेतस्थळावर अनेकदा दिशाभूल करणारी माहिती दिल्या जाते हे सत्य नाकारून चालणार नाही. जो डाटा फिड करण्यात आला आहे तो डाटा गुगलवरील सर्चच्या माध्यमातून आपल्या पुढ्यात येतो. अनेकदा हा डाटा राष्ट्रीय पातळीवरील द्वेषभावनेतून इतर शत्रू राष्ट्राकडून दिशाभूल करणाराही असू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे. यासाठी आपले डेटा सेंटर अधिक भक्कम करण्यासाठी युवा तंत्रज्ञ पुढाकार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील या दोन दिवसीय परिसंवादाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासासह अनेक संदर्भांना साक्षीदार होता आले. सीमा प्रश्न व शेजारील राष्ट्रांकडून होणारी घुसखोरी अनेक वर्षांपासून होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. भारतासारख्या यशाच्या शिखराकडे जाणा-या देशाला रोखण्यासाठी अनेक देशातील घटक अडथळे निर्माण करतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही घुसखोरी रोखण्यासाठी सैन्यबळासह तंत्रज्ञानाचे बळ अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला कसे करता येईल, आपल्या सैन्याला अधिक तंत्रकुशल कसे करता येईल यावर आपण प्राधान्याने लक्ष देण्याची गरज ले. जनरल व्ही. के. चतुर्वेदी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपले नैतिक अधिष्ठान अधिक भक्कम असले पाहिजे. प्रत्येकातील प्रामाणिकपणा व नागरिक म्हणून आपल्यावर असलेल्या कर्तव्याचे जबाबदारीपूर्ण पालन करणे महत्वाचे आहे. इतरांच्या भल्यासाठी जोपर्यंत प्रत्येक जण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात येता येणार नाही, असे प्रतिपादन एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी केले.
या परिसंवादाचे प्रास्ताविक प्रोफेसर योगेश देशपांडे यांनी केले. परिसंवादास विद्यार्थी व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
