अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी अमोल गोरे लातूर
शिक्षण विभागाचा कारभार गोंधळात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?
शालार्थ घोटाळ्यानंतर कागदपत्र अपलोडिंग गोंधळ जबाबदार कोण?
दलाली, गोंधळ, नियमभंग – शिक्षण विभागाच्या कामकाजावर संशय
________________________________________
लातूर, प्रतिनिधी
लातूर :- लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरत असून, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी नोंदी, नियुक्त्या, बदली आणि वरिष्ठता यादीच्या बाबतीत अनेक अनियमिततेच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत. अलीकडेच अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) लातूर यांनी शाळांना कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश दिले. परंतु मार्गदर्शनाविना थेट अंमलबजावणीमुळे शिक्षक, मुख्याध्यापक आणि लिपिक यांची विनाकारण तारांबळ उडाली आहे.
जबाबदारी कोणाची शिक्षकांवर का लादली जाते?
कागदपत्रे अपलोड करणे ही जबाबदारी कार्यालयीन प्रमुख आणि शाळा प्रशासनाची असताना प्रत्यक्षात ती शिक्षकांच्या माथी मारण्यात आली आहे. मुख्याध्यापक आणि लिपिकांनाही नीट प्रशिक्षण न दिल्यामुळे “मूळ कागदपत्रे अपलोड करायची की छायांकित प्रत?” याबाबतच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांना कागदपत्रे आणण्यासाठी धावपळ करावी लागत असून काही ठिकाणी तंबी देण्यापर्यंत प्रकार गेले आहेत.
शालार्थ आयडी घोटाळ्याची छाया अजून कायम
शालार्थ आयडी घोटाळ्याने आधीच शिक्षण विभागावर संशयाचे सावट आहे. अनेक ठिकाणी अपुऱ्या कागदपत्रांसह प्रस्ताव मंजूर झाले, नियमांची पायमल्ली करून आदेश पारित झाले, असा आरोप ऐकायला मिळतो. तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या काळातील भोंगळ कारभारामुळे दलालांची साखळी निर्माण झाली होती, अशी चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे.
________________________________________ हायलाइट ________________________________________
सेवाज्येष्ठता व बदली प्रक्रियेतील संभ्रम
सेवाज्येष्ठता कशी ठरवायची? – विषय शिक्षकत्व की वयानुसार?
▪️अनुदानित तुकड्यांवरील मान्यता – पद रिक्त झाल्यावर पदोन्नतीने की बदलीने भरायचे?
▪️आदेश देताना निकष कुठे? – नियम न पाळता सोयीप्रमाणे आदेश दिल्याचे आरोप.
अनेक संस्थांत या संदर्भात वाद सुरू असून, शिक्षणाधिकारी कार्यालयाने नियमांकडे दुर्लक्ष करून निर्णय घेतल्याने शिक्षक आणि शाळा प्रशासनात संभ्रम व अविश्वास वाढला आहे.
________________________________________
दलाली व आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत?
जिल्ह्यातील शिक्षण विभागातून आदेश मिळवण्यासाठी दलालमार्फत आर्थिक व्यवहार झाले, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. नियमांचे पालन, धर्मादाय आयुक्तांचे मार्गदर्शन, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
शिक्षक संघटनांची तीव्र नाराजी
शिक्षक संघटनांकडून सातत्याने शिक्षणाधिकारी व उपसंचालक कार्यालयाकडे दखल घेण्याची मागणी होत आहे. “कार्यालयीन कामाचा बोजा शिक्षकांवर नको; अपलोडिंगसाठी स्वतंत्र प्रशिक्षण द्यावे” अशी मागणी ठामपणे पुढे येत आहे. तसेच, सद्यस्थितीत कार्यरत अधिकाऱ्यांनी पारदर्शकता न राखल्यास चौकशी व कारवाई अपरिहार्य ठरेल, अशी भूमिका संघटनांनी स्पष्ट केली आहे.
चौकशीची मागणी तीव्र
SIT चौकशीमुळे काही प्रमाणात शिक्षकवर्ग समाधान व्यक्त करत असला तरी, ती पूर्णपणे निःपक्षपाती व्हावी, सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातून होत आहे.
