अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शास्त्री फार्मसी महाविद्यालयात मॅक्लॉइडस फार्मास्युटिकल्स मार्फत कॅम्पस इंटरव्हिव्ह संपन्न
प्रतिनिधी एरंडोल स्वप्नील पाटील
दि.11/08/25 रोजी शास्त्री फार्मसी महाविद्यालय पळासदळ, एरंडोल येथे मॅक्लॉइडस फार्मास्युटिकल्स कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये राज्यातील एकूण १८ महाविद्यालयाच्या ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी १९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अनेक महाविद्यालयातील डिप्लोमा, पदवी व पदवित्तर फार्मसी च्या अनेक विद्यार्थ्यांनी तसेच बीएससी / एमएस्सी च्या विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी चोपडा येथील पंकज समूहाचे भैय्यासाहेब पंकज बोरोले हे व्यासपीठावर उपस्थित होते, तसेच शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री हे उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये भैय्यासाहेब पंकज बोरोले यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील संघर्ष व अडचणी आणि करिअर या गोष्टींवर प्रकाश टाकला त्या बरोबरच व्यसनाधीनते पासून दूर राहण्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी तर अध्यक्षीय भाषांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांंना सांगितले की लहान स्वप्न बघू नका, जेव्हा मोठ्ठं स्वप्न बघाल तेव्हा तसं काहितरी आयुष्यात मिळेल. आपल्या कम्फर्ट झोन मधून निघाल्या शिवाय तुम्हाला मोठ्ठं काहीही मिळवता येणार नाही. आज शिकताना जेवढी मेहनत घेणार तेवढं तुमचं भविष्य सुखात जाईल. त्यानंतर मॅक्लॉइडस फार्मास्युटिकल्स एच.आर मॅनेजर मयंक जैन यांनी कंपनी विषयी माहिती दिली. मॅक्लॉइडस फार्मास्युटिकल्स कंपनी चे एच आर मॅनेजर मयंक जैन तसेच सहाय्यक मॅनेजर रोहिदास पानसरे व डेप्युटी मॅनेजर कृपाल राणा हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली तसेच मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प व स्मृती चिन्ह देऊन करण्यात आले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच दिसून येत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश्वरी लोहार तर आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ प्रा. अनुप कुलकर्णी, प्रा. राहुल बोरसे, प्रा. सुमेश पाटील, प्रा. दिग्विजय पाटील व प्रा. मंगेश पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
