अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
श्रावण सोमवारनिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना पुण्यातील खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर देवदर्शनासाठी पिकअप गाडीतून निघालेल्या महिलांवर काळाने घाला घातला आहे. या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला असून 35 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. घाटातील नागमोड्या वळणावरून जाताना पिकअप वाहन पलटी खाऊन 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळले. जखमींपैकी अनेक महिलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला.
पाईट परिसरातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे पिकअप गाडी ही कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर घाट चढत असताना पुढे न जाता पाठीमागे घसरल्याने ती दीडशे फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळावरील दृष्य खूपच विदारक होते. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी येतात. आज दुपारच्या सुमारास महिलांनी खच्चून भरलेले पिकअप वाहन रस्त्यावर दरीत कोसळले. रस्त्यावर रहदारी असल्याने तातडीने स्थानिक लोकांनी खाजगी व दहाहून अधिक ॲब्युलेन्सद्वारे अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच सात महिलांचा मृत्यू झाला व 35 हून अधिक गंभीर जखमी आहेत. अपघात प्रचंड गंभीर असून मृतांची संख्या वाढू शकते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
