अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मंजिगड टोल्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
टस्कर हत्तीचा दहशतवाद थांबेना!
एटापल्ली तालुक्याच्या मंजिगड टोल्यात घरांची तोडफोड; भर पावसात कुटुंब बेघर
प्रतिनिधी: गडचिरोली प्रशांत पेदापल्लीवार
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात आणि चामोर्शी तालुक्यात थैमान घालणारा टस्कर हत्ती आता एटापल्ली तालुक्यात दाखल झाला आहे. जारावंडीपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर, छत्तीसगड सीमेलगत असलेल्या मंजिगड टोल्यात काल 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास या हत्तीने गावात घुसून घराची तोडफोड केली.
या हत्तीने गावातील रिझनसाय खलको यांच्या घरावर हल्ला केला. हत्तीने घराचे छप्पर फाडले, भिंतींना भगदाड पाडले, घरातील मोबाईल फोडला, भांडी, धान आणि घरातील आवश्यक वस्तूंचे नुकसान केले. या हल्ल्यात कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले असून भर पावसात घराचे छप्पर आणि भिंती उध्वस्त झाल्याने संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे.
भर पावसाच्या काळात छप्पर नसलेल्या घरात राहणे अशक्य झाल्याने कुटुंबाला उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. “राहायचं कुठे? संसार थाटायचा कुठे?” असा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा हत्ती मागील काही दिवसांपासून सतत भाग बदलत आहे. कधी चामोर्शी परिसर, तर कधी गडचिरोलीकडे जाऊन पुन्हा एटापल्ली तालुक्यात दाखल झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संध्याकाळी व रात्री जंगलाच्या दिशेने न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हत्तीचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पीडित शेतकरी रिझनसाय खलको यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. घर, संसार आणि पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने त्वरीत मदत करावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
