अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जागतिक आदिवासी दिवस गावपातळीवर साजरा व्हावा.
अनोमदर्शी तायडे
सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे विविध कार्यक्रमांनी आदिवासी दिवस साजरा.
रावेर/ प्रतिनिधी.. दि.9 विनायक जहुरे
जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. हा कार्यक्रम जगातील आदिवासी लोकसंख्येच्या कामगिरी आणि योगदानांना मान्यता देतो आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतो.
आज सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल वढोदे प्र. सावदा येथे संस्थेच्या वतीने आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर, शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे, पर्यवेक्षक- पंकज बोदडे, यासह सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत आदिवासी शहीद बिरसा मुंडा यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील
फलकावरती अग्रभागी “पारंपारिक ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्यात आदिवासी महिलांची भूमिका” या थीम सह बैलगाडी व त्यावरील नांगर, इरली, घोंगडे यांचे चित्र सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.
गेल्या आठ दिवसांपासून शिक्षकांच्या सहकार्याने आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, पोशाख, आहार सण उत्सव आदी समजून घेण्याचा प्रयत्न अत्यंत कुतूहलाने चिमुकले विद्यार्थी करत होते.
यावेळी बोलताना, सम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे सर म्हणाले की, भारत वर्षातील जंगल संवर्धन, नैसर्गिक सौंदर्य, आयुर्वेद टिकवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य जर कोणी करत असेल तर तो इथला आदिवासी. आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेलही मात्र याच आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. परंतु आजही या आदिवासी बांधवांचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. आणि म्हणूनच जागतिक लोकसंख्येच्या एकूण दहा टक्के असलेला हा समाज आजही दुर्गम, डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करतो. तो समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठीच युनोने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे.
आज संपूर्ण देशासह आदिवासी बहुल जळगाव जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येत आहे. सातपुडा पर्वताचे नैसर्गिक सौंदर्य जोपासण्याचे काम इथल्या आदिवासी बांधवांनी केले आहे. देशाची नैसर्गिक साधन संपत्ती अबाधित असण्याचे कारणही आदिवासी समाजच आहे. एकीकडे आधुनिकीकरणाच्या नावाखाली, शहरीकरणाच्या नावाखाली वृक्षांची सर्रास कत्तल केली जाते. तर दुसरीकडे जंगलाच्या संवर्धनासाठी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरतो याचे उत्तम असे उदाहरण देता येईल ते म्हणजे हसदेव जंगल बचाव आंदोलन.
यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकमेंकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर, आदिवासी समाज बांधवांचे पोशाख, लोकगीते यामध्ये तल्लीन होऊन आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय आदिवासी’’, बिरसा मुंडा की जय’’ “धरती आबा बिरसा मुंडा अमर रहे ” अशा घोषणांनी शाळेचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,विजय भालेराव, पंकज भालेराव, तेजस्विनी तायडे , रंजना बोदडे, शितल भालेराव, कविता बैसाने ,कुंदन तायडे, विशाल बोदडे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज भालेराव सर यांनी केले. तर आभार शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे सर यांनी मानले.
