अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वडाळा(तु) येथे शासकीय योजना शिबिर संपन्न
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.7-भद्रावती तालुक्यातील ग्रामीण विभागातील शासकीय योजनेपासून वंचित लोकांना शासकीय योजनेची माहिती होऊन त्या योजनेचा लाभ सहजगतीने घेता यावा या दृष्टिकोनातून अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या वडाळा(तु) येथील उल्का कार्यालय द्वारा पर्यावरण मित्र वडाळा(तु) चे सभागृहात *शासकीय योजना शिबिर* नुकतेच संपन्न झाले. पर्यावरण मित्र संस्था विरुर स्टेशनच्या वतीने एड.विजय देठे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे जेष्ठ कार्यकर्ते शंकर भरडे यांचे अध्यक्षतेखाली महसूल निरीक्षक अनिल दडमल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. त्यावेळी वडाळा (तु) येथील पोलीस पाटील संदीप ननावरे, उपसरपंच दिलीप ढोक, आष्टा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरनुले, कृषी सहाय्यक ए.डी. रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरात पर्यावरण मित्रचे शंकर भरडे यांनी शिबिर घेण्याबाबतचा उद्देश, शासकीय योजना घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी, शासकीय विभागाशी समन्वय व पर्यावरण मित्र संस्थेची लोकाप्रत असलेली भूमिका प्रास्ताविकातुन स्पष्ट केली. महसूल निरीक्षक अनिल दडमल व तलाठी टिपले मॅडम यांनी महसूल विभागाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवांसाठी असलेल्या योजना, आपत्कालीन विमा योजना याबाबत माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुरुनुले यांनी जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करायचे, आरोग्य विमा योजना कसे काढायचे व त्याचे महत्त्व काय आहे याबाबत माहिती सांगितली. कृषी सहाय्यक एडी रामटेके यांनी कृषी विभागाच्या फळबाग योजना, रेशीम योजना, पीएम किसान योजना, पिक नोंदणी, पिक विमा, फार्मर आयडी याबाबत माहिती दिली. या शिबिरात डॉक्टर गुरनुले यांचे मार्गदर्शनाखाली एकूण 80 ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी केली त्यात आरबीएस-80, बीपी-80 आरटीके-1 या तपासणीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 15 ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले. या शिबिरात भद्रावती तालुक्याचे तहसीलदार मा. भांडारकर साहेब यांनी स्वतः भेट देऊन पर्यावरण मित्र च्या विधायक कामाला सदिच्छा दिल्या. हे विशेष. या शिबिरात वडाळा(तु), सोनेगाव, कोकेवाडा, घोसरी, मुधोली, टेकाळी, कोंडगाव, सितारामपेठ, काटवल, खुटवंडा, मानोरा, आष्टा, विलोडा या गावातील 149 महिला पुरुष यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे संचालन पर्यावरण मित्रचे शितल दडमल व आभार प्रदर्शन महानंदा ढोके यांनी केले.
