अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यातील सातनवरी ठरणार
देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव
प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त देणार 8 ऑगस्ट रोजी गावाला भेट
नागपूर, दि. 6: आरोग्य, शिक्षण यासोबतच शेतीसाठी स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, मत्स्यव्यवसाय, बँक ऑन व्हिल, स्मार्ट निगराणी व्यवस्था आदी महत्वाच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी सुसज्ज असे नागपूर ग्रामीण मधील सातनवरी हे देशातील पहिले गाव तयार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नावारूपाला येत असलेल्या या अनोख्या गावात गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरूवात झाली आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टिमसह या गावाला भेट देवून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठेवला व त्यास तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्याचे ठरले. त्यानुसार व्हाईस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेतली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक होवून नागपूर ग्रामीण मधील सातनवरी या 1800 लोकवस्तीच्या गावाची निवड देशातील हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यासाठी झाली व त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
गेल्या एक महिन्यापासून विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात स्थानिक प्रशासनाने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि व्हाईस कंपनीने सातनवरी गावात मुक्काम ठोकला असून या गावाला स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्यासाठी आवश्यक त्या सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या दिशेने कामाला सुरूवातही केली आहे. स्थानिक प्रशासन आणि विभागीय आयुक्त यांच्याशी बुधवारी, 6 ऑगस्ट 2025 रोजी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी व व्हाईस कंपनीचे वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातून श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर आयुक्त (विकास) कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे यावेळी उपस्थित होते.
सातनवरी गावात स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज प्रकल्पाच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाकडून या प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरविण्यात येत असल्याबाबतही यावेळी आश्वस्त करण्यात आले. येत्या 8 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची टिम प्रत्यक्ष सातनवरी गावाला भेट देवून गावात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी करतील व तसा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत.
