अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास वेगाने सुरू – मिळणार अत्याधुनिक सुविधांसह स्थानक
सतीश कडू नागपूर
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या अजनी रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण पुनर्विकास जलद गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचा उद्देश अजनी स्थानकाला एक आधुनिक आणि प्रवासी-अनुकूल रूप देणे हा आहे. भारतीय रेल्वेच्या प्रवासी सुविधा आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्दिष्टाचा हा भाग आहे.
पूर्व बाजूस G+3 तर पश्चिम बाजूस G+2 मजली स्टेशन इमारतीचे बांधकाम चालू आहे. पूर्व बाजूस सर्व विटा आणि प्लास्टरचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बाजूस असलेले बुकिंग कार्यालय आणि अन्य विभागांचे यशस्वीरित्या स्थलांतर करण्यात आले असून सिव्हिल कामे प्रगतीपथावर आहेत.
या पुनर्विकासाचा मुख्य आकर्षण म्हणजे 72 मीटर रूंदीचा रूफ प्लाझा/सेंट्रल कंकॉर्स, ज्यामध्ये आधुनिक प्रवासी सुविधा आणि आगमन व प्रस्थानासाठी स्वतंत्र झोन असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी तीन नवीन फुटओव्हर ब्रिज तयार करण्यात येत आहेत, त्यापैकी एक 18 मीटर रुंद असेल, जो मुख्य इमारतींना कंकॉर्सशी जोडेल.
या नव्या स्थानकात 21 लिफ्ट, 17 एस्केलेटर आणि 6 ट्रॅव्हलेटर असणार असून प्रवास अधिक सुलभ होईल. याशिवाय, कर्मचारी निवास, प्रशस्त प्रतीक्षा कक्ष, दिव्यांग अनुकूल सुविधा, सीसीटीव्ही निगराणी, दिशादर्शक फलक आणि प्रवेश नियंत्रण प्रणाली देखील प्रदान केली जाणार आहे.
ग्रीन बिल्डिंग मानकांचे पालन करत, सौर उर्जा पॅनेल, पाण्याच्या बचतीसाठी प्रणाली आणि पर्जन्य जल संचयनाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 आणि 6/7 हे उच्चस्तरीय प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले जात आहेत.
अजनी स्थानकाचा हा कायापालट भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
———–
दिनांक: 29 जुलै 2025
प्रसिद्धी पत्रक क्रमांक: 2025/07/42
ही प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.
