अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माणूस घडवा, आनंद फुलवा’: महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचा मोलाचा संदेश
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, 24 जुलै 2025: कर्मचा-यांना केवळ पगार आणि आर्थिक लाभ देण्यापुरते मर्यादित न राहता, मानव संसाधन विभागाने कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिण विकासावर आणि त्यांना ‘माणूस’ म्हणून घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा मोलाचा सल्ला महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिला आहे. गुरुवारी (दि. 24 जुलै) नागपूर परिमंडलाच्या विद्युत भवन येथील प्रशासकीय कार्यालयात आयोजित शिस्तभंग कारवाईवरील सॅप मॉड्युलच्या प्रादेशिकस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दिलीप दोडके यांनी यावेळी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक माहिती पोहोचवून त्यांचे ज्ञान वाढवण्याचे आणि त्यांचे आयुष्य अधिक आनंददायी करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, तांत्रिक आणि वित्त विभागातील अधिकारी व कर्मचा-यांवर कामाचा सतत ताण असतो, त्यांच्यावरील हा ताण कमी करण्यासाठी मानव संसाधन विभागाने कार्यरत असावे. महावितरणमधील तांत्रिक, लेखा आणि वित्त विभागांनी एकसंधपणे काम करून महावितरणची प्रतिमा उंचावण्यासाठी हातभार लावावा.
महावितरणच्या मुख्य कार्यालयाने हे ‘सॅप मॉड्युल’ कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंग कारवाईचा संपूर्ण लेखाजोखा क्षणात उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात येत असून या प्रशिक्षणात मिळणा-या सुचना विचारात घेऊन त्यास अंतिम स्वरुप दिले जाईल. या मॉड्युलची कार्यप्रणाली आणि त्याच्या वापराविषयी माहिती देण्यासाठी नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुळकर्णी यांनी या मॉड्युलची दैनंदिन कामकाजातील मदत आणि महत्त्व विषद केले. तर, मुख्यालयातील सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, वैभव थोरात, तुषार घरत आणि विवेक पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या मॉड्युलची कार्यप्रणाली समजावून सांगितली.
प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात या मॉड्युलबाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली, तर दुसऱ्या सत्रात शंकांचे निरसन करण्यात आले. याशिवाय, मॉड्युलमधील त्रुटी, अपेक्षित सुधारणा आणि क्षेत्रीय कार्यालयांना जाणवणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली. नागपूर प्रादेशिक संचालक कार्यालयांतर्गत मानव संसाधन विभागात कार्यरत सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व उपव्यवस्थापक या प्रशिक्षणास उपस्थित होते.
फ़ोटो ओळ: – शिस्तभंग या विषयावरील मॉड्युलवरील प्रशिक्षणाच्या औपचारील उद्घाटन प्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके, मुख्य महाव्यवस्थापक भुषण कुळकर्णी आणि इतर अधिकारी
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
