‘स्नेहबंध’चा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळकटी देणारा .
प्रतिनिधी -सारंग महाजन.
डॉ उद्धव शिंदे यांचा छावणी परिषदेचे सीईओ मोरे यांच्यातर्फे सत्कार
अहिल्यानगर – स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने विविध स्पर्धा, परीक्षांत यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा बक्षिसांचा आधार देणारा नसून, त्यांच्या आत्मविश्वासाला बळकटी देणारा आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा ठरतो, असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.
स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने छावणी परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व गुणगौरव करण्यात आला. याबद्दल छावणी परिषदेच्या वतीने स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी मानपत्र व शाल देऊन गौरव केला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे म्हणाले, स्नेहबंधच्या माध्यमातून डॉ. शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीचा, शिक्षण व विद्यार्थी कल्याणाबाबत असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनाचा अभिमान वाटतो. हे गौरवकार्य विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे आहे.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि छावणी परिषद यांच्यावतीने आपले पुन्हा एकदा धन्यवाद. भविष्यातही अशाच प्रकारच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहो, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी. त्यांनी स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, इतरही विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून चांगल्या पदांवर कार्यरत व्हावे, यासाठीच त्यांचा गौरव स्नेहबंधच्या वतीने केला जातो.
