संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटी नंतर तुकोबाची पालखी ३५ दिवसांनी देहूत विसावाली.
प्रतिनिधी: त्र्यंबक भालेराव
देहूगाव तब्बल १७ वर्षांच्या नंतर आळंदीत एक दिवसाच्या मुक्कामा नंतर श्री संत ज्ञानेश्वर महारांजांची भेट घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा ३५ दिवसांचा प्रवास करून सोमवारी (ता. २१) देवभूमी देहूनगरीत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुख्यप्रवेशद्वार कमानीत आली. पहाटे आळंदीतून पालखी निघाल्यानंतर आळंदी ते देहू दरम्यानच्या डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे व विठ्ठलनगरच्या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालून स्थानिक गावकऱ्यांनी पालखीचे स्वागत केले व पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. देहूकरांनसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मात्र पालखी सोहळ्याचे पारंपारिक पध्दतीने भक्तीमय आणि आनंदमयी वातावरणात ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने स्वागत केले.
देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे दुपारी साडेचारच्या सुमारास आगमन झाले. दरम्यान आभाळ दाटून आले होते व मेघराजानी जलधारांचा हलका शिडकाव करण्यास सुरवात केली होती.
पालखीच्या मार्गात यंदा बदल झाल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. पहाटे नित्यपूजे नंतर तीर्थक्षेत्र आळंदीहून वारकरी दिंडेकरी आणि भाविकांसह पालखी सोहळा तीर्थक्षेत्र देहूकडे मार्गस्थ झाला. पालखी मार्गावरील डुडुळगाव, मोशी ,कुदळवाडी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर येथील ग्रामस्थांनी पादुकांचे दर्शन घेतले. देहूच्या विठ्ठलनगर येथील श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिर येथे आल्यानंतर ट्रस्टच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. तेथे अभंग आरती घेण्यात आली. वाटेत उपस्थित ग्रामस्थांकडून पालखीचे मोठया उत्साहाने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. महिलांची मोठी गर्दी होती. सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यासंह पालखी रथाच्या बैलजोडीला औक्षण केले. रामचंद्र तुपे कुटूबियांकडून मुख्य प्रवेशद्वाराजवळ भक्तीभावाने दही भाताचे नैवद्य दाखविण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांसह संस्थानचे माजी अध्यक्ष,विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते.छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथ आल्यानंतर रथातून पालखी खांदेकऱ्यानी खांदयावर घेतले. चौकातील हनुमान मंदीरा समोर अभंग झाले. पालखी मार्गाने सोहळा मुख्य मंदिराकडे निघाली. पालखीचे महाराजांच्या जन्मस्थाना समोर आरती झाली. पालखी सोहळा मुख्य मंदिरात आल्यावर चांदीची अब्दागिरी,गरूड टक्के,सावलीते रेशमी छत्र,पालखी खांद्यावर घेऊन देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. प्रदक्षिणानंतर पालखी मंदिरातील भजनी मंडपात आल्यावर श्री विठ्ठल-रुख्मीणीच्या मंदिरात आरती झाली. आरती नंतर उपस्थित वारकऱ्यांनी ” पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ” नामाचा जयघोष करीत पताका उंचवून तुतारी, शंख, नगारा व ताशाच्या गजर नाद केला.
यावेळी मंदिराच्या परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी,मानकऱ्यांसह सर्व दिंडीचालकांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.पालखी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी,गृहरक्षक दलाचे कर्मचारी,आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी सोहळ्यातील सहभागी झालेल्यांचे संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.पालखी सोहळयाचे आनंदाच्या व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. यंदा गतवर्षी पेक्षा पालखीच्या परतीच्या प्रवासात आळंदी ते देहूगाव दरम्याने भाविकांची व वारकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
