अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0′ योजनेत प्रकल्पनिहाय समन्वय अधिकारी देणार – अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला
नागपूर, 19 जुलै 2025: “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” ची प्रभावी अंमलबजावणीसाठी करणेसाठी तसेच प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पनिहाय आणि जिल्हानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. अशी माहिती अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांनी आज नागपुरात दिली
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने साकार झालेल्या या योजने अंतर्गत 16 हजार मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे भव्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असून, त्यांना दिवसा भरवशाची वीज मिळेल आणि सिंचनाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
नागपूर जिल्ह्यासाठी 278 मेगावॉटचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी 15 विकासकांना काम देण्यात आले आले असून, 59 वीज उपकेंद्रांतील कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करायचे आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत श्रीमती आभा शुक्ला बोलत होत्या.
श्रीमती आभा शुक्ला यांनी योजनेच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये सौर प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी, तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि वन विभागाशी संबंधित अडचणी दूर करणे यावर भर देण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीची उपलब्धता सुलभ करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. खाजगी शेती जमीन मालकांना या योजनेत लाभ घेण्यासाठी मिळणाऱ्या लाभाबाबत व्यापक जनजागृती करण्याबाबत आदेशित करण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजय माहुलकर, उप वन संरक्षक अधिकारी यश काळे, जिल्हा भुसंपादन अधिकारी इंदिरा चौधरी, महानिर्मितीचे मुख्य अभियंता रमेशकुमार ओस्वाल, अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण कार्यालय उदय भोयर, जिल्हा विद्युत निरीक्षक उमाकांत धोटे, महाऊर्जाचे व्यवस्थापक सारंग महाजन महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, बैठकीला महाराष्ट्र एम एस ई बी सोलरॲग्रो पॉवर लिमिटेडचे सल्लागार श्रीकांत जलतारे, नविकरणीय ऊर्जाचे अधीक्षक अभियंता निखील मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विकासकांना इशारा: वेळेत काम पूर्ण करा…
श्रीमती आभा शुक्ला यांनी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” च्या नागपूर जिल्ह्यातील प्रकल्प विकासकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी विकासकांना त्यांच्या प्रकल्पाच्या प्रगतीची नियमित नोंद योजनेसाठी तयार केलेल्या पोर्टलवर करण्याचे तसेच वेळेत प्रकल्प पुर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्रीमती आभा शुक्ला यांनी वेळेत प्रकल्प पूर्ण करणाऱ्या विकासकांना केंद्र शासनातर्फ़े प्रति मेगावॉटसाठी 1 कोटी रुपये आणि महाराष्ट्र शासनातर्फ़े प्रति युनिट 25 पैसे अनुदान मिळणार असल्याची माहितीही दिली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचा थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होणार असल्याचे श्रीमती आभा शुक्ला यांनी नमूद केले.
या योजनेच्या पोर्टलमध्ये विकासकाला जमिनीबाबत तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत येणाऱ्या अडचणी मांडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचा ‘ॲक्सेस’ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आला आहे. यामुळे प्रकल्प उभारणीत येणाऱ्या समस्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर देखील निराकरण होईल, असेही श्रीमती आभा शुक्ला यांनी सांगितले.
फोटो ओळ – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0″ च्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेतांना अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, सोबत इतर अधिकारी.
