Echorang Production प्रस्तुत जन्मांतर नियतीचा खेळ आणि प्रेम होऊ दे या कलाकृतींचा भव्य पोस्टर लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी सारंग महाजन
नव्याने स्थापन झालेल्या Echorang Production या कलाप्रेमींच्या गटाने आपली पहिली मोठी कलाकृती सादर करताना जन्मांतर आणि नियतीचा खेळ या दोन दमदार एकांकिकांचे तसेच प्रेम होऊ दे या प्रेमगीताच्या पोस्टरचे भव्य अनावरण नुकतेच मोठ्या जल्लोषात पार पाडले
कार्यक्रम दिनांक 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पुण्यातील Maitree The Place, स्वारगेट येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला कला, नाट्य, संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. महेश टिळेकर, अनिल नगरकर, संतोष नेटके, अरुण शिर्के सर यांसारखे प्रतिष्ठित व्यक्ती विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Echorang Production हा नव्या दमाच्या कलाकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेला सांस्कृतिक गट आहे. लहान थोर कलाकारांचा हा अभिनव समूह एकत्र येऊन मराठी रंगभूमीला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे.
या समूहाअंतर्गत सादर होणारी दोन एकांकिका—
जन्मांतर’ — लेखन व दिग्दर्शन सौरभ बाबू कांबळे
नियतीचा खेळ’ — लेखन व दिग्दर्शन प्रजासत्ताक बनसोडे
या दोन्ही नाट्यकृती स्त्रियांवरील अत्याचार, सामाजिक प्रश्न आणि मानवी संवेदनशीलतेवर भाष्य करणाऱ्या आहेत. प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत.
त्याचबरोबर प्रेम होऊ दे हे प्रेमभावनेने भरलेले गाणंही या प्रसंगी सादर करण्यात आलं. या गीताचे लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश कुमरे यांनी केलं असून हे गाणं 26 जुलै 2025 रोजी सर्व OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
कार्यक्रमात कलाकारांचा उत्साह, चाहत्यांची गर्दी, आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे सोहळा संस्मरणीय ठरला. उपस्थितांनी कलाकारांच्या अभिनयाचं, लेखनाचं आणि सादरीकरणाचं भरभरून कौतुक केलं.
Echorang Production च्या या पहिल्याच उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, हा गट लवकरच मराठी नाट्यसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करेल याबाबत शंका नाही.
