पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार आकाश बनसोडेवर जीवघेणा हल्ला, तिघां आरोपींच्या वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी
पुणे शहरांत सोशल मीडियावर ‘रिल स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आकाश उर्फ (अक्क्या ) बनसोडे याच्यावर धारदार शस्त्रांने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वाघोलीतील उबाळेनगर परिसरांतील त्याच्या कपड्याच्या दुकानात गुरुवारी (दि. ५ जुलै) रात्री झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरांत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या आरोपींपैकी दोन युवक प्रौढ असून, एक अल्पवयीन आहे. अनिकेत दीपक वानखेडे (वय १८) आणि प्रविण गोविंद माने (वय १८, दोघेही रा. खराडी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्या सोबत असलेल्या अल्पवयीन आरोपीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी ज्ञानोबा जाधव (वय १९, रा. उबाळेनगर, वाघोली) याने वाघोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश बनसोडे आपल्या कपड्याच्या दुकानात असताना तिघे हल्लेखोर दुकानात घुसले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी बनसोडेच्या डोक्यावर, उजव्या भुवईवर, ओठांवर व मांडीवर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याच्या वेळी त्याचा मित्र ज्ञानोबा जाधवही घटनास्थळी उपस्थित होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई सुरू केली. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शिरूर येथे लपल्याचे समजल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी वाघोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, प्रतिक्षा पानसरे, आणि कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केली. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात हे वैयक्तिक वादातून घडले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाश बनसोडे हा सोशल मीडियावर ‘अक्क्या’ या नावाने ओळखला जातो. त्याचे व्हिडिओ व पोस्ट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून, युवकांमध्ये त्याचा मोठा फॅनबेस आहे. त्यामुळे या हल्ल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून, अनेकांनी त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमकी पार्श्वभूमी शोधण्यासाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली जात आहे,
