जलसंपदा प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कटिबद्ध होणे आवश्यक
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
जिल्ह्यात होणार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची कार्यालये पेंच प्रकल्पातील अतिक्रमणे तात्काळ काढण्याचे आदेश
महसूलमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा
नागपूर दि. 5 : विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषासह नागपूर जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रकल्पांना शासनाने अनेक वर्षांपूर्वी मान्यता दिली. यात काही उपप्रकल्प, काही कालव्यांचा समावेश आहे. 15 वर्षांपूर्वी ज्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे त्या प्रकल्पांची कामे अजूनही पूर्णत्वास पोहोचली नाहीत अशी खंत महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. ज्या-ज्या विभागाची प्रकल्प व कामे प्रलंबित आहेत त्या-त्या विभागप्रमुखांनी स्वत:हून आपले प्रकल्प, कामे कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. मंत्रालयीन स्तरावर जर कामांबाबत तांत्रिक त्रुट्या असतील तर त्या दुरुस्तीसाठी कर्तव्यतत्पर अधिकारी नेमून खबरदारी घेण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार विकास ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवी पराते, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीमती सोनाली चोपडे, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील, गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय विश्वकर्मा, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल फरफडे, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पेंच प्रकल्पातील अतिक्रमणे तात्काळ काढण्याचे आदेश
पेंच प्रकल्पाच्या 20 टक्के जागेवर अतिक्रमण आहे. याची जबाबदारी सिंचन विभागाने स्विकारुन येत्या 3 महिन्यात अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग व सिंचन विभागातील अधिकाऱ्यांचा एक कृतीगट तयार करुन याबाबत प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करण्यास त्यांनी सांगितले.
आजही लहान-मोठ्या नदी नाल्यांच्या पाण्यामुळे पावसाळ्यात अनेक घरे पाण्याखाली जातात. अनेक घरे विविध प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रात, बॅक वॉटरमध्ये आहेत. अशा घरांची संख्या किती आहे, जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांमुळे किती शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात याबाबत निश्चित प्रस्ताव व ऐच्छिक पूनर्वसन आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या भागात सतत पाणी साचते तिथे बांबु लागवड, ग्रास लँड, सोलर प्रकल्प आदी साकारण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
कन्हान नदी प्रकल्पांतर्गत कोच्छी बॅरेज, बुडीत क्षेत्र बाधित गावांचे पुनर्वसन, ढालगाव खैरी येथील निवाड्याची कामे, कुही येथील चिंचघाट तसेच कार नदी, लखमापूर व सालई मोकासा या प्रकल्पांची आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. महाराष्ट्र सिंचन सुधारणा योजनेत नागपूर येथील जाम मध्यम प्रकल्प येथील 4 हजार 576 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार असल्याची माहिती देण्यात आली.
मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यालय बांधकामांबाबत गावनिहाय प्रस्ताव सादर करा
सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीपर्यंत होण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांची कार्यालये व उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण तलाठ्यांची संख्या, मंडळ अधिकारी यांची संख्या लक्षात घेऊन गावकऱ्यांच्या सोईच्या दृष्टीने योग्य राहील अशी जागा निवडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
आपल्या कार्यक्षेत्रातील विविध गावांना प्रत्यक्ष भेट देऊन कार्यालये व कामांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. लोकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या गावपातळीवर मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तलाठी यांनी आठवड्यातील ठराविक दिवस दौरे, गृहभेटी तसेच पाहणी करण्याचे आदेश दिले. पट्टे वाटप, सातबारा तसेच नागरिकांची महसूल विषयक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तालुकास्तरावर शेतकरी संवाद व ग्रामसभेच्या आयोजनातून गावकऱ्यांच्या प्राथमिक स्वरुपाच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत असलेल्या गावातील पाणंद रस्ते व नाल्यांच्या कामांची जबाबदारी त्यांचीच
नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत असलेल्या गावातील नाल्यांची दुरुस्ती, निगा, पाणंद रस्त्यांची कामे याची जबाबदारी स्विकारुन ती पूर्ण केली पाहिजे. याचे मालकीत्व इतर विभागाचे नसून ते आपले आहे, अशा जबाबदारीतून ही कामे वेळेत पूर्ण केली पाहिजे. याचबरोबर गावातील पाणंद रस्त्यांसह इतर प्रकारच्या रस्त्यांचा नकाशा प्रत्येक ग्रामपंचायतीत त्यांच्या हद्दीनुसार लावण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. प्रत्येक गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष कॅम्प लावून मोहिम राबविण्यास त्यांनी सांगितले.
