मोफत सीसीटीव्ही संच देण्यास वंचित बहुजन आघाडी तयार, तरीही अधिकाऱ्यांचा ते स्विकारन्या करीता नकार — पिंपळखुटी चेकपोस्टवरील भ्रष्टाचाराविरोधात अन्नत्यागासह आमरण उपोषण सुरू
प्रतिनिधी ज्योत्स्ना करवाडे
अमरावती,दि.०१ जुलै २०२५
कृषी क्रांतीचे प्रणेते मा.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी आणि कृषी दिनाच्या पवित्र औचित्यावर, विदर्भातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सीमावर्ती भ्रष्ट कारभार याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी,यवतमाळच्या वतीने पिंपळखुटी (ता.पांढरकवडा,जि. यवतमाळ) येथील परिवहन तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात अन्नत्यागासह आमरण उपोषणाला आज दिनांक १ जुलै(मंगळवार) रोजी अमरावती येथे सुरुवात करण्यात आली आहे.
दिनांक ९ जून २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी यवतमाळ तर्फे परिवहन विभाग,अमरावती येथे लेखी निवेदनाद्वारे पिंपळखुटी चेक पोस्टवरील भ्रष्टाचाराची गंभीर माहिती देण्यात आली होती. त्यानंतर १८ जून रोजी स्मरणपत्राद्वारे पुन्हा कारवाईची मागणी करण्यात आली.मात्र,अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
२६ जून रोजी संबंधित कार्यालयात सीसीटीव्ही प्रणाली भेट देण्याच्या मागणीसाठी प्रत्यक्ष भेट देण्यात आली होती.परंतु,ती मागणीही नाकारण्यात आली.
विशेष बाब म्हणजे,पिंपळखुटी तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही प्रणाली बसवण्यासाठी आवश्यक सीसीटीव्ही संच व साहित्य देण्यास वंचित बहुजन आघाडी स्वतः तयार आहे,परंतु क्षेत्रीय परिवहन अधिकारी,परिवहन विभाग अमरावती यांनी ते साहित्य स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
हे सर्व दाखवते की संबंधित यंत्रणांकडून या गंभीर प्रकरणात अपारदर्शकता व निष्क्रियतेचा पवित्रा कायम आहे.
आज,०१ जुलै २०२५ रोजी कृषी दिनी,जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कार्यक्रम साजरे करत आहे,त्याच दिवशी आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरोधात संघर्ष करत आहोत.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी व पारदर्शकता निर्माण करण्यासाठी हा लोकशाही मार्गाने लढा सुरू केला आहे.
मुख्य मागण्या:
पिंपळखुटी तपासणी नाक्यावरील लाचखोरी व बेकायदेशीर वाहतूक प्रकरणाची सखोल चौकशी
सीसीटीव्ही प्रणालीची तातडीने बसवणूक व सर्व्हरवर थेट देखरेख
जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई
भ्रष्ट यंत्रणेचा बंदोबस्त करून, शेतकरीहिताची आणि कायदा सुव्यवस्थेची पूर्तता
वंचित बहुजन आघाडी यवतमाळच्या वतीने सांगण्यात आले की,“लोकशाही मार्गाने लढा उभारूनच यंत्रणा बदलावी लागेल,” आणि या संकल्पनेवर विश्वास ठेवूनच आम्ही आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे,राहुल मेश्राम (जिल्हाध्यक्ष, अमरावती),महासचिव शिवदास कांबळे,मनोज चौधरी (शहराध्यक्ष, अमरावती),प्रमोद राऊत,रमेश आठवले, सागर भवते,शैलेश बागडे,प्रशांत गजभिये,भूषण हिवराळे,विजय डोंगरे, सुनील उके,विजय भिसे इत्यादी उपस्थित होते.
