लासलगावमध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनास सुरुवात
कार्यकारी संपादक किरण सोनवणे
लासलगाव (ता. निफाड): रवींद्र पाटील नाशिक
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) लासलगाव शाखा आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करत आजपासून शाखा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांनी केलं असून अनेक शेतकरी आणि सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बँकेतून कर्ज घेताना त्यांच्या खात्यातून २०२२ साली ‘SBIG आरोग्य प्लस’ विमा पॉलिसीसाठी ऑनलाईन रक्कम कपात करण्यात आली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी यासंबंधी आरोग्य विम्याचे फायदे समजावून दिले, मात्र चार वर्ष उलटूनही प्रत्यक्ष विमा उतरवण्यात कंपनी अपयशी ठरली. यामुळे गरजेच्या वेळी विमा सुविधा मिळाल्या नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
पीडित खातेदारांनी बँक आणि इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही २०२५ पर्यंत त्यांना विमा पॉलिसी मिळालेली नाही. त्यामुळे कोणत्याही आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदतीचा आधार न मिळाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
“नावाजलेल्या बँकेच्या शाखेमध्ये जर ग्राहकांशी असा गैरव्यवहार होत असेल, तर सामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. चार वर्षांपूर्वी रक्कम कपात होऊनही पॉलिसी नसणे हा मोठ्या गैरव्यवहाराचा गंभीर इशारा असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलकांशी संपर्क साधत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी स.पो.नि. भास्करराव शिंदे, माजी सभापती शिवा सुरासे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे, डॉ. विकास चांदर, केशवभाऊ जाधव, संतोष पानगव्हाणे यांसह अनेक मान्यवरांनी आंदोलन स्थळाला भेट दिली.
