मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी घेतला नागपूर प्रादेशिक विभागाच्या कामांचा आढावा
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि. 22 – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सार्वजनिक बांधकाम प्रदेशिक विभाग नागपूर अंतर्गत पूर्ण झालेल्या तसेच प्रगतीत असलेल्या रस्ते,पूल व इमारतींच्या कामांचे संबंधाने बैठक घेतली.या प्रसंगी मा.मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व अभियंत्यांना संबोधित करतांना सांगितले की आजच्या युगात शासनाकडून विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा फार उंचावलेल्या आहेत व त्यांचे अपेक्षानुरूप गुणवत्तापूर्ण,वेगाने व शासनाच्या काटकसरीच्या धोरणानुसार कमी खर्चात सर्व प्रकल्प पूर्ण करून सामान्य जनतेला वापरासाठी हस्तांतरित करणे हे आपले कर्तव्य आहे.या बैठकीदरम्यान मुख्य अभियंता श्री दिनेश नंदनवार यांनी त्यांचे अधिनस्त क्षेत्रात पूर्ण झालेल्या अत्याधुनिक इमारती,रस्ते,व पुलांचे संबंधाने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले.यावेळी त्यांनी सांगितले की मा.मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचे कार्यक्रमात पूर्ण करावयाची कामे या विभागाने निधीची वाट न बघता या प्रादेशिक विभागास देण्यात आलेल्या उद्दिष्टांपेक्षाही जास्त कामे पूर्ण केलेली आहेत.त्यावर मंत्री महोदयांनी विभागाचे कौतुक केले व पुढील कार्यक्रम पूर्ततेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मा.मंत्रीमहोदयांनी सांगितले उपलब्ध नैसर्गिक बांधकाम साहित्याचा उपयोग करत असताना बांधकाम साहित्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करावा जसे की इमारतींचे बांधकाम करतांना सागवान किंवा तत्सम महागड्या लाकडांचा उपयोग न करता बांबूचा वापर पॅनेलीग व फ्लोरिंग करिता केल्यास खर्च कमी येईल शिवाय बांबूवर इतर महागड्या लाकडांपेक्षा वाळवीचा अथवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होत नसल्याने कमी खर्चात जास्त आयुष्य असलेले बांधकाम करणे आपल्याला शक्य होईल.
हे सादरीकरण करतेवेळी प्रादेशिक विभागाच्या संबंधाने इतर प्रशासकीय बाबी जसे की अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल,चौकशी प्रकरणे,कनिष्ठ स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांची पदभरती करणे,कर्मचाऱ्यांच्या अडचणी,निसर्गाचा समतोल राखण्यास्तव मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे व इतर अनुषंगिक गोष्टी विभागाने तत्काळ हाताळाव्या जेणेकरून शासनाच्या कामांना वेग येईल व त्यानुषंगाने लोकाभिमुख व नाविण्यपूर्ण उपक्रम आपल्याला राबविता येतील असे निर्देश मा.मंत्रीमहोदयांनी दिले.
या बैठकीस मुख्य अभियंता श्री दिनेश नंदनवार,अधीक्षक अभियंता श्री जनार्दन भानुसे,श्रीमती नीता ठाकरे,श्री अरुण गाडीगोणे,प्रादेशिक विभागातील सर्व कार्यकारी अभियंता/उप अभियंता व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री दिनेश नंदनवार यांनी केले.
आढावा बैठकीच्या आयोजनासाठी कार्यकारी अभियंता श्री लक्ष्मीकांत राऊळकर, मुख्यालय उप अभियंता श्री संजय उपाध्ये,शाखा अभियंता श्री विशाल मराठे,श्री राहुल ठाकूर व श्री राजेंद्र बारई यांनी विशेष परिश्रम घेतले
