मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
धरणगाव येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करत आता ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मुख्य इमारतीच्या आणि डॉक्टर्स निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे धरणगाव आणि परिसरातील नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे आरोग्य सेवेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, स्थानिक आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण हे शासनाचे प्राधान्य असून, धरणगाव येथे उभारले जाणारे हे रुग्णालय परिसरातील लोकांसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
