महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन – विदर्भ पाणी परिषदेत मार्गदर्शन
प्नारतिनिधी : सतिश कडु | नागपूर, दि. ८ :
नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या उदाहरणाचा हवाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘झिरो डिस्चार्ज’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याची आज गरज असल्याचे सांगितले. जलसंवर्धनाच्या माध्यमातूनच विकसित महाराष्ट्र घडवता येईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृहात तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘यशोगाथा सादरीकरण’ या सत्रात मंत्री बावनकुळे बोलत होते.
कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, सांगली नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे विलास चौथाई, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव आप्पासाहेब पाटील, राष्ट्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र गाडेकर, मुरादपूर योजनेचे रुपेश सयाम, ‘तामसवाडा पॅटर्न’चे मिलिंद भगत, वाशिमचे सचिन कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प केला आहे. भविष्यातील पेयजल संकट लक्षात घेता, पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची व नियोजनाची गरज आहे. मृतावस्थेतील जलसाठा प्रकल्प पुनरुज्जीवित करून ९ हजार बंधारे दुरुस्त केल्यास मोठ्या प्रमाणात जलसंपत्तीचा लाभ होईल.”
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपल्या गावातील मृत बंधारे शोधून त्यांची दुरुस्ती करून जलसंवर्धनात योगदान देऊ शकतात. नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाच्या माध्यमातून ‘नाले-जोड अभियान’ राबवले जात असून, ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत पर्यावरण अभियानाअंतर्गत ‘आईच्या नावाने एक झाड’ लावण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
💡 यशोगाथांचे सादरीकरण :
रुपेश सयाम (मुरादपूर) – तरंगते सौर ऊर्जा आधारित उपसा सिंचन योजना
मिलिंद भगत (पूर्ती जलसिंचन संस्था) – तामसवाडा पॅटर्न
सचिन कुलकर्णी (वाशिम जिल्हा) – ग्रामस्तरावर श्रमदानातून पाणी व्यवस्थापन
गणपतराव आप्पासाहेब पाटील – कृत्रिम निचरा प्रणालीद्वारे क्षारपड जमीन सुधारणा
विलास चौथाई – सांगली नदी पुनर्जीवन प्रकल्प
कार्यक्रमाचे संचालन अधिसभा सदस्य डॉ. राज मदनकर यांनी तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी केले.
