सतिश कडु | मुंबई, दि. ८ जून २०२५
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “भारत गौरव – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” या विशेष पर्यटक ट्रेनचा शुभारंभ येत्या ९ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांची उपस्थिती लाभणार आहे.
ही विशेष ट्रेन ५ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ऐतिहासिक स्थळांचा दौरा करणार असून, यामध्ये रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळा या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवा आयाम मिळेल.”
यात्रेचा प्रवास मार्ग:
मुंबई (CSMT) → रायगड → पुणे → शिवनेरी → भीमाशंकर → प्रतापगड → कोल्हापूर → पन्हाळा → मुंबई
या टूरमध्ये प्रवाशांना ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, स्थानिक मार्गदर्शक, शाकाहारी भोजन, AC/Non-AC हॉटेलमध्ये निवास, प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
SL, 3AC व 2AC या तीन श्रेणीमध्ये ही यात्रा उपलब्ध असून, www.irctctourism.com व www.mtdc.co या संकेतस्थळांवर आरक्षणासाठी माहिती देण्यात आली आहे.
प्रवासाचा कालावधी – ५ दिवस / ६ दिवसांची सहल (सकाळी समाप्ती)
प्रारंभ व समाप्ती ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई
इतर स्थानके – दादर, ठाणे येथूनही प्रवाशांना चढाई/उतराईची सुविधा उपलब्ध
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी जनतेला आवाहन केले की, “या ऐतिहासिक सहलीत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, परंपरा आणि संस्कृतीचा साक्षात्कार घ्यावा.”
