प्रतिनिधी : संतोष लांडे | पुणे – ६ जून २०२५ :
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवशाही प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रोहिडा किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गडावर पुन्हा एकदा शिवप्रेमातून आणि स्वच्छतेच्या ध्यासातून ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.
या उपक्रमात किल्ल्याच्या परिसरातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या व इतर कचरा हटविण्यात आला. तसेच बुरुजांमध्ये उगवलेली झाडे काढण्यात आली. काही ठिकाणी पडलेले फलक व बुरुज दुरुस्त करून पुन्हा लावण्यात आले, ज्यामुळे गडाचे सौंदर्य अधिक खुलून आले.
या मोहिमेत शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव, राज्य सचिव तेजस राऊत, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अथर्व तावरे यांच्यासह प्रथम परिट, कृष्णा कुडळे, अथर्व गोलांडे, लोकेश गोपाळे, सागर नेरे, गणेश रेड्डी, प्रथमेश राऊत, सिद्धार्थ तावरे आदी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमाबाबत बोलताना राज गोविंद जाधव म्हणाले, “किल्ले हे आपल्या इतिहासाचे अभिमानचिन्ह आहेत. त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. शिवराज्याभिषेक दिन हा या कामासाठी सर्वोत्तम प्रेरणा देतो.”
