मुख्य संपादक – संतोष लांडे | पुणे
पुणे जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजारातील भाजीपाला आणि पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. या पावसाने अनेक शेतकरी संकटात सापडले असून, फळभाज्यांची काढणी थांबली आहे. परिणामी, बाजारात चांगल्या प्रतीच्या भाज्यांचे प्रमाण घटल्याने दरात मोठी उसळी आली आहे.
मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात सामान्यतः राज्य व परराज्यातून दररोज ८० ते ९० ट्रक मालाची आवक होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या संख्येत कमालीची घट झाली आहे. पावसामुळे काही भागांत भाज्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी काढणीच रखडली. व्यापारी सांगत आहेत की चांगल्या प्रतीच्या भाज्यांचा पुरवठा कमी असल्याने त्यांना जास्त दराने विक्री होत आहे.
दरवाढीचे हे परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या ताटावरही दिसून येत आहेत. गुरुवारी किरकोळ बाजारात मेथीच्या एका गड्डीसाठी तब्बल ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. कोथिंबीर, पालक, अंबाडी, कांदापात अशा पालेभाज्यांचे दरही ३० ते ४० रुपये गड्डीपर्यंत पोहोचले आहेत.
सध्याचे बाजारभाव (प्रती किलो):
गवार – ₹१२०
शेवगा – ₹१०० ते ₹१२०
मटार – ₹१२० ते ₹१६०
दोडका – ₹१०० ते ₹१२०
भेंडी – ₹१०० ते ₹१२०
सिमला मिरची – ₹१०० ते ₹१२०
याबाबत माहिती देताना ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले की, “पावसाचा फटका भाज्यांच्या उत्पादनावर बसला असून पुढील काही दिवसांत दरात फारशी घट होण्याची शक्यता नाही.”
दरम्यान, या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले असून, “आमच्या ताटात आता पालेभाज्याच राहिलेल्या नाहीत,” अशी प्रतिक्रिया अनेक गृहिणींनी व्यक्त केली. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवक सुरळीत करण्याचे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे मागणी केली जात आहे.
