प्रतिनिधी : किरण सोनवणे.
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात कौटुंबिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या पाच महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचे तब्बल ८० गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून दिवसाआड एक प्रकरण नोंदवले जात असल्याचे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे शिक्षित, स्वावलंबी महिलांनाही मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचे अनेक प्रकरणांतून दिसून आले आहे. यामुळे ‘कौटुंबिक हिंसाचार कधी थांबणार?’ असा प्रश्न समाजात उपस्थित झाला आहे.
तक्रारीत विलंब – न्यायात अडथळा
कायद्याच्या आधारे महिलांना सासरी होणाऱ्या छळापासून संरक्षण दिलं जातं. मात्र, अनेक महिलांना त्रास असह्य झाल्यानंतरच तक्रार करण्याची हिंमत होते. परिणामी अनेकदा उशीर झाल्याने न्यायप्रक्रिया कठीण होते.
समुपदेशन हाच उपाय?
तज्ज्ञांच्या मते, विवाहपूर्व आणि विवाहपश्चात समुपदेशन गरजेचे आहे. दोन्ही कुटुंबांनी विवाहाआधी परस्परांना समजून घेतले पाहिजे. समुपदेशनामुळे मतभेद सोडवता येतात आणि हिंसाचार टाळता येतो.
तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणिवेची जोड हवी
मोबाईल फोनच्या अति वापरामुळे वैवाहिक आयुष्यात गैरसमज, संशय आणि भांडणं वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांनी केवळ तांत्रिक शिक्षण नव्हे तर सामाजिक जाणीव आणि निर्णयक्षमता वाढवणेही गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
थोडक्यात :
कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहणे गरजेचे आहे. महिलांनी वेळीच तक्रार करणे, जोडप्यांनी समुपदेशन घेणे आणि तरुणांनी सामाजिक बुद्ध्यांक वाढवणे या गोष्टी केल्यासच ही समस्या आटोक्यात येईल.
