मुख्य संपादक : संतोष लांडे
पुणे: शहरात दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असतानाच, अचानक ढगाळ हवामान झाले आणि पावसाला सुरुवात झाली.
सकाळी मोकळे आकाश आणि उन्हामुळे अनेक नागरिक रेनकोट किंवा छत्री न घेता बाहेर पडले होते. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होत गेल्याने अचानक मुसळधार पावसामुळे अनेकजण अडकले. वाहतूक ठप्प झाली, रस्ते घसरडे झाले आणि काही वाहनधारकांनी रस्त्याच्या कडेला थांबणे पसंत केले.
हवामान खात्याचा इशारा
हवामान विभागाने पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आजपासून पुन्हा पावसाची पुनरागमन झाले आहे.
झाडांपासून सुरक्षित अंतर ठेवा
मागील काही घटनांमध्ये झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे अपघात घडले असून काही प्रकरणांत जीवितहानीही झाली आहे. त्यामुळे जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी झाडांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सूचना:
हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवा.
शक्यतो बाहेर पडताना छत्री वा रेनकोट सोबत ठेवा.
झाडांच्या आसपास व पार्किंग करताना सावधगिरी बाळगा.
