प्रतिनिधी: आदित्य चव्हाण
भिगवण (दि. ५ जून): बारामती-भिगवण रोडवरील लामजेवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली.
या अपघातात अक्षय बबन आव्हाड (वय २३, मूळ रा. खानापूर, जि. अहिल्यानगर, सध्या रा. बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. तो कामानिमित्त बारामती येथे राहत होता.
भिगवणहून बारामतीकडे जात असताना लामजेवाडी घाटातील वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ट्रकने दुचाकी (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरात धडक दिली. अपघातात अक्षय याच्या डोक्याला व हातापायांना गंभीर इजा होऊन तो जागीच ठार झाला.
याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात योगेश सिध्देश्वर शिंदे (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली असून, ट्रकचालक इराणा यशवंत अलगी (वय ४०, रा. मनकलगी, ता. विजापूर, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलिस करत आहेत.
