मुख्य संपादक : संतोष लांडे
दि. ५ जून २०२५ — गोपीकिशन मंगल कार्यालय, गोकुंदा येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन आमदार भीमरावजी केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि उत्कृष्ट पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी भूषवले. यावेळी विजय सूर्यवंशी, परमेश्वर पेशवे, संभाजी सूर्यवंशी, आनंद शिनगारे, दादाराव कयापाक, श्रीनिवास नेमानिवार, अजय कदम, सचिन वैद्य व नैतिक नाईक आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. किनवट-माहूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याच कार्यक्रमात आमदार केराम यांच्या हस्ते देशव्यापी YGPS चॅनेलचे लोकार्पण झाले. जिल्हाभरातून आलेल्या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आले.
विविध शैक्षणिक संस्थांमधून घडून आलेल्या यशस्वी व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद कांबळे आणि सय्यद इसा यांनी केले.
महाराष्ट्रासह देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
