पुणे-सातारा महामार्गावर केळवडे हद्दीत बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. क्रेसेंट भरलेला डंपर शिवापूर टोलनाक्याच्या दिशेने जात असताना, मागून आलेल्या मालवाहू ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत डंपर पलटी झाला. धडक इतकी तीव्र होती की डंपरचा डावीकडील टायर फुटून वाहन रस्त्यावर उलटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामार्गावर क्रेसेंट सांडल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
बेकायदेशीर रस्त्यांमुळे अपघातांना आमंत्रण.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांनी आरोप केला की हॉटेल्ससमोरच्या सर्व्हिस रोडवरील डिव्हायडर्स बेकायदेशीरपणे फोडण्यात आले असून, अशा रस्त्यांद्वारे वाहने थेट महामार्गावर उतरतात. या अनधिकृत प्रवेशमार्गांमुळे महामार्गावरील वेगवान वाहतुकीस धोका निर्माण होतो.
> “अशा बेकायदेशीर रस्त्यांमुळे ब्रेक लावण्याची संधीच मिळत नाही आणि अपघात घडतात. टोल प्रशासन वेळेवर कारवाई करत नाही, त्यामुळे आमचे जीव धोक्यात येतात,” असे मत एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केले.
स्थानिकांची मागणी :
बेकायदेशीरपणे फोडलेले डिव्हायडर्स त्वरित बंद करावेत
हॉटेलसमोरचे अनधिकृत अप्रोच रस्ते हटवावेत
महामार्गावरील होर्डिंग्ज व फ्लेक्स काढून टाकावेत
टोल प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
या दुर्घटनेमुळे एकूणच महामार्ग सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
